सातारकरांच्या जल्लोषी सत्काराला ललिता बाबरचे भावनिक उत्तर
सातारा : रिओ ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीने देशासह जिल्ह्याची मान उंचावणार्या ललिता बाबरचे आज सातार्यात जंगी स्वागत करण्यात आले. 32 वर्षानंतर रिओ ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटीक़्स प्रकारात दखलपात्र कामगिरी करणार्या ललिता बाबरचे परवा देशात आगमन झाल्यानंतर सातार्यात तिचा जंगी सत्कार होणार अशी चर्चा होती. या संदर्भात विभागीय कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख तसेच माण खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून व सातारकरांच्या उत्स्फूर्त सहभागातून आज सकाळी 10 वाजता राजवाडा येथील गांधी मैदानावर जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील तसेच इतर अधिकारी व राजकीय मान्यवरांच्या हस्ते ललिताचा सत्कार करण्यात आला.
या सत्काराला सातारचे खा. उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, श्रीमंत छ. शिवाजीराजे भोसले, आ. आनंदराव पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते साहेबराव पवार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सातारा हिल मॅरेथॉनचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ललिता बाबर हिला जिल्हाधिकारी क्रिडा अधिकारी कार्यालयाकडून 1 लाख रुपयांचा, साहेबराव पवार यांच्याकडून 51 हजार रुपयांचा, शिवराज ससे यांच्याकडून 25 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच विविध क्रिडा व सामाजिक संघटनांनी बाबरला आर्थिक मदत केली.
यानंतर गांधी मैदान, मोती चौक, पोलीस मुख्यालय यामार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक पोवई नाक्यावर येताच येथील ऐतिहासिक छ. शिवरायांचया पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ही मिरवणूक शाहूपुरी क्रिडा संकुल येथे मार्गस्थ झाली. या मिरवणुकीमध्ये अधिकार्यासंह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या अनेक लोकंानी ललिताचे स्वागत केले. त्यामुळे आज सर्व सातारा ललितामय झाला होता.
सातारा येथील शाहू क्रीडा संकूलात या सत्कारा प्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कोकणचे आयुक्त प्रभाकर देशमुख, आ. जयकुमार गोरे, श्री. छ. शिवाजीराजे भोसले, आ. प्रभाकर घार्गे, आनंदराव पाटील, ललीताचे वडील शिवाजी बाबर व आई यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्कार प्रसंगी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ललीताच्या नेत्रदिपक कामगिरीबद्दल अभिनंदन करुन तिला यापुढे कायस्वरुपी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मिळावा यासाठी आपण विधीमंडळात प्रयत्न करु असे सांगून पुढील ऑलिंपिकसाठी शुभेच्छा दिल्या.
सातारा एक्स्प्रेस म्हणून देशभर नावलौकिक पावलेली अर्जुनफ पुरस्कार प्राप्त धावपटू ललिता बाबर सातारकरांच्या प्रेमाने भारावून गेल्याचे सांगते. 2020 मध्ये टोकियोत होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालून सातारकरांना मीही पे्रमाची भेट देईन, माझे मोही गाव, माण तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशाच्या अपेक्षांना पुरी पडण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धेत धावले. माझ्यासाठी शंभूमहादेवाकडे साकडे घालणार्या माझ्या आई-वडिलांसह सर्वच सातारकरांचे मी मनापासून ऋणी राहीन, अशी भावना ललिताने सुरुवातीला व्यक्त केली. ऑलिम्पिकमधील कामगिरीबाबत ललिता म्हणाली, तब्बल 32 वर्षांपूर्वी भारताची धावपटू पी. टी. उषा ऑलिम्पिकमध्ये धावली होती, त्यानंतर मला ती संधी मिळाली. त्यामुळे मोठं दडपण होतंच. भारतीय क्रीडाप्रेमींच्या माझ्याकडून अपेक्षाही होत्या. त्या पूर्ण करण्याची मी जिद्द बाळगली होती. मी त्याप्रमाणे सराव केला. माझी कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न मी केला. अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात यश आले; परंतु मला मेडल मिळाले नाही, याचे दु:ख आहे.फ असे उद्गार तिने बोलताना काढले.
या सभारंभास राजेंद्र शेळके यांचेही अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी ललीताच्या टोकीओ येथील स्पर्धेसाठी तिला कायमस्वरुपी प्रशिक्षण मिळावे व विविध स्पर्धांमध्ये भाग घेता यावा यासाठी आपण प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगितले.

आ. प्रभाकर घार्गे यांनी बोलताना हे क्षण अतिशय आनंदाचे असून ललीताकडून इतरांनी स्फुर्ती व पेरणा घेत देशाचे नाव जगात नेहण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.
आ. जयकुमार गोरे यांनी दुदर्म इच्छा शक्ती व प्रयत्नाच्या पराकाष्टेनेच ललीताने यश मिळवत इतिहास निर्माण केला याचा अभिमान वाटतो. खाशाबा जाधव यांच्यानंतर 64 वर्षानंतर जिल्ह्याला ऑलिपिक स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली पुढील ऑलिंपिकमध्ये राहिलेली उणीव भरुन काढायची असल्याने सरकारला तिच्या पाठीशी राहण्यासाठी भाग पाडू असे आश्वासन दिले. समारंभाचे प्रस्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी केले. ललीताचा सत्कार एक लाख रुपये, सन्मान चिन्ह, छत्रपती शिवरायांचा पुतळा व कंदी पेढ्यांचा हार घालून करण्यात आला.