सातारा ः सातारा जिल्ह्यातील 11 पंचायत समितीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवला असून सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवारांची सभापतीपदी निवड झाली. कराड तालुक्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, माजी आ. विलासकाका उंडाळकर यांच्या कराड विकास आघाडीच्या सदस्यांनी राष्ट्रवादीस पाठिंबा दिल्याने कराड पंचायत समितीच्या सभापती राष्ट्रवादीकडे आले असून उपसभापती कराड विकास आघाडीला देण्यात आले. खंडाळा तालुक्यात आ. मकरंद पाटील यांनी काँग्रेसलासोबत घेवून उपसभापती पद देवू सत्ता स्थापन केली.
सातारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने सत्ता मिळवली. तसेच सातारा, जावली, महाबळेश्वर, वाई, खंडाळा, फलटण, कोरेगाव, माण, खटाव, पाटण तालुक्यातील पंचायत समितीवर राष्ट्रवादीने बहुमत मिळावले. मात्र, कराड तालुक्यात राष्ट्रवादीला 7, काँग्रेसला4, भाजपला 6 आणि माजी आ. विलासकाका उंडाळकर यांच्या कराड विकास आघाडीस 7 पंचायत समिती गणात विजय मिळवता होता. त्यामुळे सभापती निवडीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. यावर आ. बाळासाहेब पाटील यांनी आ. विलासकाकांना बरोबर घेवून पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या शालन माळी, उपसभापतीपदी कराड विकास आघाडीच्या रमेश देशमुख निवड झाली. सातारा पंचायत समितीमध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांंच्या गटाला 11 तर खा. उदयनराजे भोसले यांच्या गटाने भाजपला सोबत घेवून 9 चे संख्याबळ जुळवले होते. मात्र, यावेळी झालेल्या निवडणुकीत सभापती राष्ट्रवादीचे मिलिंद कदम व उपसभापती जितेंद्र सावंत यांची 11 विरुध्द 9 अशी निवड झाली. आ. शशिकांत शिंदे यांच्या कोरेगाव तालुक्यात सभापती पद खुले झाल्याने राजाभाऊ जगदाळे यांची सभापती व उपसभापती संजय साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. फलटण पंचायत समिती सभापतीपद महिलांसाठी राखीव असल्याने त्याठिकाणी साखरवाडी गणातील रेश्मा भोसले यांची तर उपसभापतीपदीन शिवरुपराजे खर्डेकर यांची निवड करण्यात आली. माण तालुक्यात शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने काँग्रेसला धुळ चारली. सभापती अऩुसूचित जातीसाठी राखीव असल्याने रमेश पाटोळे हे एकमेव दावेदार होते. त्यांची बिनविरोध निवड झाली. तर उपसभापतीसाठी नितीन राजगे यांची निवड केली.
खटाव तालुक्यात 12 जागांपैकी 8 जागी राष्ट्रवादीने मिळवल्या होता. सभापतीपद खुले असल्याने राष्ट्रवादीअंतर्गत चुरस वाढली होती. त्यामुळे सभापतीपदी संदीप मांडवे व उपसभापती कैलास घाडगे यांची निवड करण्यात आल्या. वाई तालुक्यात काँग्रेसला शह देवून एक हाती सत्ता मिळवली. त्यात भुईज गटात माजी आ. मदन भोसले यांना शह देण्यासाठी सभापतीपदी सौ. रजनी भोसले यांची वर्णी लागली. तर उपसभापती पदी केंजळ गणातील ज्येष्ठ नेते अनिल जगताप यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सतत संघर्ष सुरु असताना खंडाळा तालुक्यात आ. मकरंद पाटील यांनी सभापती व उपसभापती निवडीत कॉग्रेसचा हात धरला. पंचायत समितीच्या 6 जागांपैकी 3 राष्ट्रवादी, 1 काँग्रेस व 2 अपक्ष असे पक्षीय बलाबल होते. सत्ता स्थापनेसाठी अखेरी काँग्रेसची साथ घ्यावी लागली. त्यामुळे सभापती मकरंद मोटे व उपसभापती काँग्रेसच्या वंदना धायगुडे यांची निवड करण्यात आली.
जावली पंचायत समितीमध्ये सर्व सहा जागा राष्ट्रवादीने जिंकल्या. सभापतीपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्याने अरुणा शिर्के व उपसभापती दत्तात्रय गावडे यांची वर्णी लागली. महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रवादीने 3 तर शिवसेनेने एका ठिकाणी विजय मिळवला होता. सभापतीपद खुले झाल्याने संजय गायकवाड व रुपाली राजपुरे यांच्यात चुरस निर्माण झाली होती. मात्र, अखेरी जिल्हा बँकेचे संचालक राजेश राजापुरे यांनी आपली ताकद वापरुन पत्नी रुपाली राजपुरे यांच्या गळ्यात सभापतीची माळ घातली. तर उपसभापती पदी सौ. अंजना कदम यांची निवड केली.
पाटण तालुक्यात आ. शंभूराज देसाई गटाला शह देत सत्यजितसिंह पाटणकर यांनी पंचायत समितीवर राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळवून दिले. त्यामुळे सभापतीपदी उज्वला जाधव व उपसभापती पदी राजाभाऊ शेलार यांची निवड करण्यात आली. कराड तालुक्यात राष्ट्रवादीला 7, उंडाळकर गटास 7, भाजपला 6 व काँग्रेसला 4 जागा असा समिश्र कौल मिळाला होता. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी माजी आ. विलासकाका उंडाळकर यांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष होते. ते भाजपचे अतुल भोसले की राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील यापैकी कोणाला साथ देणार त्यावर पंचायत समितीच्या सत्तेचे चित्र स्पष्ट होणार होते. अखेर उंडाळकरांच्या 7 सदस्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली. त्यामुळे सभापती राष्ट्रवादीच्या शालन माळी व उपसभापती कराड विकास आघाडीच्या रमेश देशमुख यांची निवड झाली.