पाटण वासीयांनी तहसीलदार टोंपे व राजाभाऊ काळे यांचे मानले आभार..; कोविड सेंटरवर बंद पडलेला ऑक्सिजन पुरवठा केला सुरळीत

पाटण – पाटण येथील कोविड सेंटर मधील ऑक्सिजन पाईप मध्ये बिघाड झाल्याने तेथे ऍडमिट असलेल्या रुग्णांना त्रास होत होता व त्यांना उपचारासाठी इतरत्र हलवीले जात होते. दोन दिवस निर्माण झालेल्या परस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे यांची कोविड सेंटर मधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याची धडपड सुरू होती. तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी देखील राजाभांऊच्या धडपडीचे गांभीर्य लक्षात घेऊन शनिवारी रात्री उशिरापर्यंत पाटण येथील कोविड सेंटरवर थांबून बंद पडलेला ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केला. यानंतर कोविड सेंटरमधील रुग्णांनी तहसीलदार योगेश्वर टोंपे व राजाभाऊ काळे यांचे आभार मानले.

पाटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवीन इमारत वस्तीग्रुह येथे असलेल्या कोविड सेंटर मधे आठ ऑक्सिजन सिलेंडर वर पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे गुरवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवसांत रुग्णांच्या बेडपर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत झाला नाही. ऐनवेळी येथील चार रुग्णांना कराड व सातारा येथे कोविड सेंटर वर हलविण्यात आले. या सेंटर वर अनेक सुविधांचा अभाव असून ऑक्सिजन पुरवठ्यात तांत्रिक झालेला बिघाड त्वरित दुरुस्त करून ऑक्सिजन बेडपर्यंत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यात यावा.. अशी मागणी होत होती.
कोविड रुग्णांची अवस्था लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ काळे यांनी या सेंटरवरील बिघाड झालेला ऑक्सिजन पुरवठा त्वरित सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी आरोग्य विभागाने आपले आकलेचे तारे तोडत ऑक्सिजन पुरवठा सुरु करण्यासाठी शासकीय नियमावली लावली. यावेळी दै.ग्रामोध्दार, दै.महासत्ता च्या पत्रकारनीं कोविड सेंटरला जाऊन ऑक्सिजन पुरवठा यंत्रनेची प्रत्यक्ष पाहणी केली. सरकारी काम नऊ महिने थांब.. अशी अवस्था नजरेसमोर आल्यानंतर यासंदर्भात वृत्तांकन करण्यात आले. तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी देखील कोविड सेंटरवरील तांत्रिक बिघाडाने बंद पडलेल्या ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु करुन शनिवारी रात्री ११.३० वा पर्यंत स्वतः व राजाभाऊ काळे यांना सोबत घेऊन बंद पडलेला ऑक्सिजन पुरवठा अखेर सुरु केला. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होताच कोविड सेंटरवर दाखल असलेल्या रुग्णांनी तहसीलदार योगेश्वर टोंपे, राजाभाऊ काळे व सहकाऱ्यांचे आभार मानून धन्यवाद दिले.