फलटण : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज सकाळी आरती झाल्यानंतर बरडच्या दिशेने माऊलींच्या जयघोषात अतिशय भक्तीमय वातावरणात निघाला.
फलटणमधील एक दिवसाचा मुक्काम आटोपुन पालखी बरडच्या दिशेने मार्गस्थ झाली. फलटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या विडणी गावामध्ये अर्धा तास विसावा घेऊन पुन्हा माऊलींचा जयघोष करत पंढरीच्या दिशेने निघाला. विडणी याठिकाणी बाळासाहेब शेंडे तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी अनेक भाविक उपस्थित होते. पालखी सोहळा विडणीपासुन निघाल्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास पिंपरद या गावी भोजनासाठी विसावा घेतला. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच विवाध संस्था, पक्ष यांच्याकडून माऊलींना जेवण, नाष्टा तसेच चहा पाण्याची सोय करण्यात आली होती.जेवण झाल्यानंतर हा सोहळा बरड गावच्या दिशेने निघाला.सायंकाळी 5 च्या सुमारास हा सोहळा बरड गावामध्ये दाखल झाला. यावेळी पालखी सोहळ्याचे स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात आले.आजचा बरड येथील मुक्काम झाल्यावर उद्या पालखी सोहळा हा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. उद्या सकाळी फलटण तालुक्यातुन पालखी सोहळ्यास अखेरचा निरोप दिला जाणार आहे.