रहिमतपूर : रहिमतपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकमध्ये नगराध्यक्षपदासाठी 3 उमेदवार व नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 37 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. रहिमतपूर नगरपालिकेचे एकूण मतदान 14019 होते त्यापैकी एकूण मतदान 12015 एवढे आहे. त्यामध्ये 5785 महिला तर 6230 पुरषांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची सरासरी 85.71 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा महसूल उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद सवाखंडे यांनी दिली. त्याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
रहिमतपूर नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना यांच्यात तिरंगी लढत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील माने व सौ. चित्रलेखा माने-कदम, राष्ट्रीय काँग्रेसचे निलेश माने आणि शिवसेनेचे वासुदेव माने यांनी या निवडणूकीची सूत्रे हाती घेतली होती. ही निवडणूक सर्व राजकीय पक्षांच्या चिन्हांवर होत असल्यामुळे तिन्हीही पक्षांची प्रतिष्ठा पणाला या निवडणूकीत लागली आहे. मतदान सकाळी 7.30 वाजता सुरु झाल्यानंतर प्रत्येक पक्षांचे नेते प्रमुख कार्यकर्ते मतदान केंद्रावर उपस्थित होते. सकाळी 7.30 ते 9.30 च्या पहिल्या टप्यात 12.08 टक्के मतदान झाले. त्यानंतर 7.30 ते 11.30 च्या दरम्यान 32.85 टक्के, दुपारी 1.30 वाजेपर्यत 55.62 टक्के दुपारपर्यंत निम्यापेक्षा जास्त मतदान झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढणार ही अपेक्षा लोकांना होती. त्यानुसार मतदान करुन घेण्यासाठी दुपारी 3.30 च्या पर्यंत 73.91 टक्के मतदान झाल्याने अंतिम टप्यात किती टक्के मतदान होईल याची उत्सुकता शहरामध्ये सर्वत्र होती. त्यानुसार मतदान संपण्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत म्हणजे सायंकाळी 5.30 वा. 85.71 टक्के मतदान झाले. सकाळपासूनच सर्व मतदान केंद्रांवर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मतदान प्रक्रियेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांच्यासह पोलीस कर्मचार्यांचे संपूर्ण शहरात बारकाईने लक्ष होते. दरम्यान प्रभाग दोन मध्ये मतदानाला घेवून जाण्यावरुन दोन चुलत भावांमध्ये वाद झाल्याने परस्पर विरोधी तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल झाल्या आहेत. एवढा अपवाद वगळता रहिमतपूरमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत झाल्याचे समजते.
नायब तहसिलदार श्री. अमर रसाळ यांची पत्रकारांना दुय्यम वागणूक
रहिमतपूर नगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयात मतदान अंतिम आकडेवारी घेण्यासाठी त्यांच्या कक्षात प्रवेश करताच हे कोण? असा प्रश्न करत कक्षातून बाहेर जाण्यासाठी सांगितले. आमचे काम झाल्यावर आपणास आकडेवारी मिळेल असा आदेशच त्यांनी काही दैनिकांच्या पत्रकारांना दिला. नायब तहसिलदारांच्या या तिरक्या वागणूकीने पत्रकारांनी संताप व्यक्त केला. मतदान ओळखपत्र असताना देखील पत्रकारांना न ओळखणार्या नायबतहसिलदारांचे लक्ष कोठे होते?