सातारा : येथील छत्रपती शाहू क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला.
ध्वजवंदनानंतर परेड कमांडर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक डॉ.शशिकांत भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर पालकमंत्री श्री.शिवतारे यांनी पोलीस व्हॅनमधून विविध पथकांचे निरीक्षण केले. त्यात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांची आरएसपी, एनसीसी, स्काऊट गाईडची मुले व मुलींच्या पथकांचा समावेश होता. जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव,अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख पाटील, नगराध्यक्ष माधवी कदम तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या असंख्य वीर पुत्रांनी, शूर सैनिकांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना अभिवादन करुन पालकमंत्री श्री. शिवतारे पुढे म्हणाले, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमत: मी आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो. देशाची एकता, अखंडता, स्वातंत्र्य आणि सार्वभौमता कायम राखण्यासाठी अनेक शूर सैनिकांनी हौतात्म्य पत्करलं. त्या सर्व वीरपुत्रांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करून मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसही वंदन करतो. महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि सातारचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचेही स्मरण या दिवशी करणे हे आपणा सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. या सोहळ्यासाठी आज आवर्जून उपस्थित सर्व सन्माननीय स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, सैन्यदलातील तसेच राज्याच्या पोलीस दलातील आजी माजी अधिकारी, कर्मचारी, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, पत्रकारिता, समाजकारण आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सर्व बंधू-भगिनींचं स्वागत करतो, असे सांगून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.
आकर्षक संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम..विविध विभागांचे चित्ररथ आणि दिमाखदार संचलन करण्यात आले. यामध्ये पोलीस, गृहरक्षक दल, पोलीस बॅण्ड पथक, छाबडा सैनिक स्कुलचे संचलन, आरएसपी, विविध शाळातील विद्यार्थ्यांच्या पथकांचा समावेश होता. प्राथमिक शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि निवडणूक कार्यालयाचा मतदार जनजागृती आदी उत्कृष्ट चित्ररथांचे संचलन करुन योजनांची जनजागृती केली.
सांस्कृतिक कार्यक्रमात कन्या शाळा राजपथच्या विद्यार्थीनींनी फ्लॅग मार्चींग तर कन्या विद्यालय करंजेपेठ, सहयाद्री माध्यमिक विद्यालय शाहूनगर, ज्ञानउदय मंदिर कृष्णानगर खेड, सुशीलादेवी साळुंखे विद्यालय, साधना प्राथमिक व माध्यमिक शाळा गोडोली, महाराजा सयाजीराव विद्यालय यांनी लेझिम प्रात्यक्षिके सादर केली. श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जगदंब जगदंब या गीतावरील नृत्य सादर केले. कन्या विद्यालय करंजेपेठ, युनियन माध्यमिक स्कूल, कन्या शाळा राजपथ, न्यू. इंग्लिश स्कूल, भवानी विद्या मंदिर आणि महाराजा सयाजीराव विद्यालय यांनी झांज प्रात्यक्षिके सादर केली. वरील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आजच्या प्रजासत्ताक दिनाचे खास आकर्षण होते.
पुरस्कारांचे वितरण..विविध पुरस्कारांचेही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ध्वजदिन निधी 2015 च्या उत्कृष्ट निधी संकलन प्रित्यर्थ महाराष्ट्र शासन सैनिक कल्याण विभागामार्फत प्राप्त पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांना यावेळी देण्यात आले. स्काऊटगाईड राष्ट्रपती प्राप्त पुरस्कार महात्मा फुले ओपन युनिटचा ओंकार बेंद्रे, श्री.शिवाजी विद्यालय मसूरचा विशाल शेंडे,कन्या शाळ करंजेची विद्यार्थींनी शिवानी चोरगे, सरस्वती मि.स्कूलची सोनाली आटळे, अपुर्वा बरगे, दिव्या सणस, मेघना पाटील, प.म.शिंदे कन्या विद्यालय दहिवडीची स्मिता शिंदे, न्यू इंग्लिश स्कूल सायळीची प्राजक्ता बांबरस, मेघणा शिंणगारे, पु.बापुजी साळुंखे विद्यालय असवलीची नूतन संपा, शितल इंगुलकर, नम्रता भिलारे, तेजस्विनी ढमाळ, विठामाता विद्यालय कराडची रेवती पवार यांना पुरस्कार देण्यात आला.
जिल्हा पोलीस दलातर्फे नाविन्यपूर्ण कामगिरी केलेल्या हवालदार बिपीन ढवळे, देवानंद बर्गे यांचा सत्कार करण्यात आला. लघुउद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट उद्योजगता प्राप्त जिल्हा पुरस्कार 2016 चे प्रथम मानकरी मे.इनोव्हेटीव्ह अॅटोमेशन प्रॉडक्ट्स चे मनीष शहा,व्दितीय क्रमांक मे. टर्निंग पॉईंट इन्डस्ट्रीजचे विवेक गोवेकर आणि मे.श्रीराम पॅटर्न वर्क्सचे मनोज पानस्कर यांना विभागून देण्यात आला. यांनतर पालकमंत्री श्री.शिवतारे यांनी स्वातंत्र्य सैनिक व सर्व निमंत्रीत यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
RELATED ARTICLES