कराड: बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. पण वेळीच निदान करून उपचार घेतल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो, असे प्रतिपादन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कराड आणि कृष्णा अभिमत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. सौ. सुलभा कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ वेणुताई चव्हाण स्मारक येथे कॅन्सर : समज-गैरसमजफ या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर कृष्णा रूग्णालयातील कॅन्सरतज्ज्ञ डॉ. आनंद गुडूर, किमोथेरपी तज्ज्ञ डॉ. रश्मी गुडूर, रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी, डॉ. राहुल फासे, सेक्रेटरी अभय नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की अज्ञानामुळे कॅन्सरबाबत समाजात आजही मोठ्या प्रमाणात भिती पसरली आहे. मुळातच कॅन्सर कशामुळे होतो हे जाणून त्यावर प्रतिबंधात्मक उपाय केले तर कॅन्सरची लागण होण्यापासून बचाव करणे शक्य आहे. तोंडाचा कॅन्सर टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळावे. फुफ्फुसाचा कॅन्सर टाळण्यासाठी विडी-सिगारेटचे सेवन करू नये, असे प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाय आहेत. वयाच्या 30-35 नंतर पहिले बाळंतपण होणार्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर बळावण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पहिले बाळंतपण योग्यवेळी करून, बाळाला सुरवातीचे सहा महिने स्तनपान देणे हा स्तनाचा कॅन्सर रोखण्याचा प्रतिबंधात्मक उपाय समजला जातो. लिव्हरचा कॅन्सर, ब्लड कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर असे कॅन्सरचे अनेक प्रकार असून, त्याची लक्षणे जाणून घेऊन वेळीच निदान व उपचार सुरू झाल्यास कॅन्सर बरा होऊ शकतो.
यानंतर कॅन्सरतज्ज्ञ डॉ. आनंद गुडूर व डॉ. रश्मी गुडूर यांनी कॅन्सरचे प्रकार, त्याची लक्षणे कशी ओळखावीत व त्यावरील उपचार पद्धती याबाबत सविस्तर विश्लेषण केले. यावेळी कॅन्सरवर विजय मिळविलेल्या काही रूग्णांनी आपले अनुभव कथन केले. याप्रसंगी कृष्णा मेडिकल महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी डॉ. आनंद गुडूर लिखित आणि डॉ. गौरी ताम्हणकर दिग्दर्शित लव्ह यू जिंदगीफ ही नाटिका सादर केली. या नाटिकेत संकल्प कुरूंदवाडे, अभिषेक कामत, मृण्मयी लिमये, मधुरा कुलकर्णी, सारंग पाठक, अक्षित मोदी, जिनय मेहता, प्रणव देवधर, प्राजक्ता दाते, नील म्हामरावाला यांनी साकारलेल्या भूमिकांना उपस्थितांनी चांगली दाद दिली.
कार्यक्रमाला कृष्णा सरिता महिला बझारच्या संस्थापिका उत्तरा भोसले, कृष्णा नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली मोहिते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.