सातारा : आपलाच आपल्यावर विश्वास नसल्यामुळे मानसिक दडपण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने प्रत्येक अडचणीला सामोरे जावे. तेव्हाच मानसिक दडपण येणार नाही आणि मार्ग सुकर होईल असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनिमेश चव्हाण यांनी व्यक्त केले. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे भावनिक आरोग्य या विषयावर आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कॅम्पसचे संचालक प्रा. डॉ. आर. जे. डायस होते.
डॉ. चव्हाण म्हणाले, निरोगी राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक आरोग्यबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे. अलीकडे दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांवर अनेक समस्यांचे ओझे असल्याचे जाणवते. तसेत त्यांना बर्याच मानसिक विचारांना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे दडपण, कधी – कधी पालकांमुळे येणारा ताण, परीक्षेतील ताण- तणाव, स्वतःवरील आत्मविश्वास कमी असणे यासर्व कारणांमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत. विद्यार्थी मनातल्या मनात विचार करत असेल तर किंवा त्याच्या मनातील विचारांमुळे त्याचे मानसिक अथवा शारिरीक आरोग्य बिघडते. कार्यक्रमाला यशोदा टेक्निकल कॅम्पसचे संचालक प्रा. डॉ. आर. जे. डायस, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रा. एस. आर. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डी. फार्मसी, बी. फार्मसी आणि एम. फार्मसीचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. सुचरिता कंडारकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. आर. जाधव यांनी आभार मानले.