धर्मनिरपेक्ष पक्षांचा जातीयवादी चेहरा उघड ; जिल्ह्यावासीयांसमोर बुरखा फाटला :- सादिकभाई शेख

सातारा: – सातारा जिल्हा हा पहिल्यापासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून टिमकी वाजविणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या जातीयवादाचा बुरखा फाटला असून सातारा जिल्ह्यातील हेच पक्ष खरे जातीयवादी पक्ष आहेत हे वेळोवेळी स्पष्ट झालेच आहे परंतु जिल्हा नियोजन समिती तसेच राज्य पातळीवरील नेमणुकामधून हे सिद्ध झाले आहे असा आरोप ऑल इंडिया मुस्लिम ओ बी सी ऑर्गनायझेशनचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सादिकभाई शेख यांनी प्रसिद्धीपत्रक द्वारे केला आहे .

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच काँग्रेस विचारांचा प्रभाव राहिला असून हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे . सातारा जिल्ह्यातील जनतेने पुरोगामी व धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षांना नेहमी साथ देत विचारसरणीचा पगडा व वर्चस्व सिद्ध केले . काही अपवाद वगळता सातारा जिल्ह्याने जातियवादि म्हणून कांग्रेसने ठरवलेल्या पक्षांना सत्तेत पाठविण्यापासून लांब ठेवले .
सातारा जिल्ह्यातील राजकारणात नेहमीच अल्पसंख्याक म्हणजेच अल्पसंख्याकांमधील महत्वाचा घटक असलेला मुस्लिम समाज हा काँग्रेस विचारसरणीची पाठराखण करताना दिसला आणि हेच सूत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर ही तसेच राहिले . सातारा जिल्ह्याने राज्याची सूत्रे सांभाळणारी नेते मंडळी दिली व त्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाने भरभरून साथ दिली .हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला परंतु त्या धर्मनिरपेक्ष सहयाद्रीच्या मजबुतीसाठी मुस्लिम समाज भरपूर राबला .अगदी छ शिवरायांच्या वंशज असलेल्या कै. भाऊसाहेब अभयसिंहराजे भोसले यांना मंत्रिमंडळात सामील करून घेण्यासाठी बॅ अब्दुल रहेमान अंतुले यांना मुख्यमंत्री होऊन साताराला यावे लागले होते.
धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मांदियाळीत आणि सत्ताकारणात मात्र मुस्लिम समुदायाच्या राजकीय महत्त्वाकांक्षा व अपेक्षेला हरताळ फासत नेहमीच पाठ दाखवली. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येताना किंवा आल्यानंतर देखील धर्मनिरपेक्ष ह्या भावनिक मुद्याला भुलत मुस्लिम समाज काँग्रेसच्या बरोबरच राहिला .परंतु वोट बँकच्या ऐवजी मुस्लिम समाजाला वेगळे स्थान ह्या पक्षांच्या कडून मिळालेच नाही हा इतिहास कोणीही नाकारू शकत नाही . संघटना बांधणीसाठी अल्पसंख्यांक मोर्चा आणि विभाग काडून मुस्लिम समाजाला मर्यादित ठेवण्याचे काम ह्या पक्षांनी केले आहे .
महाबळेश्वर मधील पहिले मुस्लिम नगराध्यक्ष हे मातोश्रीच्या आशीर्वादाने बनले आणि मातोश्री ही त्यावेळेस मुस्लिम विरोधी आहे असा प्रचार ह्याच धर्मनिरपेक्ष पक्षांनी केला होता . साताराचा पहिला मुस्लिम नगराध्यक्ष खा छ उदयनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने झाला आणि छ उदयनराजे यांना मंत्रिपद भाजपच्या माध्यमातून मिळाले होते व आज ते भाजपचे खासदार आहेत . ह्याउलट धर्मनिरपेक्ष पक्षांच्या नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक निवडताना सुद्धा मुस्लिम समाजातील अल्पसंख्याक संघटनेच्या पदाधिकार्यांच्यात भांडणे लावून त्यांना सत्ते पासून दूर ठेवले आहे . काही ठिकाणी कबरस्थानच्या जागे मधून रस्ता मिळविण्यासाठी व त्यावर सह्या करून मुस्लिम समाजाच्या विरोधाला सामोरे जाण्यासाठी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीला नगराध्यक्ष बनविले.
जातीयवादी म्हणून ज्यांना बदनाम केले अश्या पक्षांनी व त्या पक्षातील नेत्यांनी वेळोवेळी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधीला सत्तेत स्थान दिले परंतु सातारा जिल्ह्याच्या काँग्रेस विचारांच्या पक्षाकडून समाजाची अवहेलना केली .कराड मध्ये राज्याचे व केंद्रात नेतृत्व करणारे नेते सुद्धा नगरपालिका निवडणुकीत मुस्लिम प्रतिनिधी निवडून आणू शकले नाहीत.राष्ट्रवादी कांग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शफीक शेख 20 वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणूनच निष्ठावंत कार्यकर्ते बनून निवडणुकीच्या वेळेस समाजाचे मेळावे घेत पक्ष वाढिसाठी आणि पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी झटताना दिसतात .परंतु महामंडळ निवडीपासून सत्ता व शासकीय कमिटी बनविण्याच्या निर्णयापासून शाफिक शेख यांना नेहमीच दूर ठेवण्यात आले .
राष्ट्रीय कांग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष झाकीर पठाण यांची सुद्धा अवस्था अशीच आहे .सतेचे पद ,महामंडळ सदस्य निवडीपासून सातारा जिल्ह्यात मुस्लिमांना कधीच संधी दिली गेली नाही हे सत्य आहे.
धर्मनिरपेक्ष पक्षांनी अटीतटीच्या असलेल्या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाच्या जीवावर बऱ्याच जागा मिळवून देखील त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे .
सातारा जिल्हा नियोजन समितीच्या निवडीवेळी मुस्लिम समाजाचे प्रश्न मांडून सोडविण्यासाठी जिल्हा नियोजन मध्ये मुस्लिम प्रतिनिधी असणे गरजेचे आहे अशी परिस्थिती असताना व कोणतेही राजकीय आरक्षण नसताना अशासकीय सदस्य म्हणून धर्मनिरपेक्ष पक्ष संधी देईल ही अपेक्षा असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजाला डावलून त्यांचे गाऱ्हाणे मांडण्याची संधी धुडकावून लावत आपला जातीयवादी चेहरा सिद्ध केला आहे असे प्रतिपादन सादिकभाई शेख यांनी केले .
राज्याच्या महामंडळ सदस्य नियुक्ती मधील तब्बल 64 पदे ही मुस्लिम समाजासाठी असताना देखील आजपर्यंत सातारा जिल्ह्याला त्याठिकाणी संधी मिळाली नाही . सातारा जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाजाच्या विकासाच्या कोणत्याही विकासकामांसाठी भरघोस निधी काँग्रेस पक्षाने दिला नाही . मागील 2 वर्षात सत्ता असताना 10 लाखाचे सुद्धा विकास काम नगरपालिका क्षेत्रात झाले नाही.
कोणत्याही शहरात ह्या पक्षांनी शादी महल ,जमात खाना किवा सांस्कृतिक हाल किंवा सभागृह बांधून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत . हे सत्य असताना मुस्लिम समाज येथून पुढे अंधभक्ती दाखवून बुरखा फाटलेल्या धर्मनिरपेक्ष पक्षाला किती संधी देईल हे सुद्धा आता लवकरच स्पष्ट होईल तसेच सातत्याने मुस्लिम समाजावर अन्याय करणाऱ्या व धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटलेल्या जातीयवादी चेहरा स्पष्ट झालेल्या काँग्रेसने सुधारणा न केल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुस्लिम समाज त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही सादिकभाई शेख यांनी दिला आहे