सातारा : जिल्हयातील निवडणुकांच्या अनुषंगाने रात्री दहानंतर सुरु राहणार्या हॉटेल्सवर कारवाई करावी. त्याचबरोबर शस्त्रधारकांनी आपली शस्त्रे स्वेच्छेने जमा करावी अन्यथा त्यांचा परवाना जप्त करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज दिला.
जिल्हयातील निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, पोलीस विभाग यांची आज आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य निवडणूक निरीक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेश देशमुख,पोलीस अधिक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय पवार, निवडणूक निरीक्षक विश्वजीत माने, पुरुषोत्तम जाधव आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यावेळी पुढे म्हणाले, जिल्हयातील नगरपंचायती नवीन आहेत. त्यांची मतदान केंद्रेही नवीन आहेत. मतदारांना त्याची माहिती व्हावी त्यासाठी प्रचार, प्रसिध्दी करावी त्यासाठी आपल्या स्तरावर बैठक घ्यावी. मतदारांना मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी त्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी. ज्या शस्त्रधारकांकडे शस्त्रे आहेत त्यांनी आपली शस्त्रे स्वेच्छेने पोलीसांकडे जमा करावीत. अन्यथा त्यांची परवाने जप्त करण्यत येतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आजच्या या बैठकीत मतमोजणीचे ठिकाण, मतपत्रिका छपाईबाबत केलेले नियोजन, मतदान केंद्र निश्चिती, निवडणूक प्रशिक्षण, आचार संहिता अंमलबजावणी बाबत उपाययोजना, मतदानासाठी आवश्यक साहित्य उपलब्धता, उमेदवार/ पक्ष खर्च कशा पध्दतीने ऑन लाईन स्विकारावा याबाबत निवडणूक आयोगाचे प्रशिक्षण, मिडीया सेल, संवेदनशील व अति संवेदनशील मतदान केंद्र आणि उपाययोजना, मतदारांना द्यावयाच्या ओळखचिठ्या आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या तयार करण्याबाबतचे नियोजन आदि विषयांबाबत आढावा घेण्यात आला.