सातारा : सत्ताधार्यांच्या कारभाराला जनता वैतागली असून आता उद्रेकाची वेळ आली आहे. तरी मतदानातून हाच उद्रेक दाखवून भाजपाला नगरपालिकेत भरघोस यश मिळवून देण्याचे आवाहन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सुवर्णाताई पाटील यांनी प्रभाग क्र. 13 मध्ये आयोजित महिला बैठकीत बोलताना केले. यावेळी प्रभाग क्र. 13 मधील उमेदवार विमलताई पाटील व किशोर पंडीत उपस्थित होते.
आतापर्यंतच्या सत्ताधार्यांनी शहराचा काहीही विकास केलेला नाही. पुणे, मुंबई सुधारत असताना सातारा शहर कितीतरी पटीने मागे राहिला आहे. सातार्यात औद्योगिकीकरणाला चालना नाही. त्यामुळे युवकांना नोकरीसाठी जिल्ह्याबाहेर जावे लागते. उच्च शैक्षणिक दर्जा नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. महिला सबलीकरणासाठी कोणतीही व्यवस्था नाही, शहरात गुंडगिरीची दहशत, शहरात पाणी पुरवठ्याचा खोळंबा, रस्त्यातील खड्डे, गटारांची अस्वच्छता, शहरातील पार्किंग व्यवस्थेतील ढिसाळपणा यामुळे सातारा शहर बकाल झाले आहे. तरी आता परिवर्तनाची वेळ आली असून सातारा नागरिकांनी तसेच महिलांनी परिवर्तन घडवण्यासाठी भाजपाला मत द्यावे असे त्यांनी यावेळी आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.