सातारा : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, सहकाररत्न स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या 75 व्या जयंतीनिमीत्त श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर दि. 5 व दि. 6 मे रोजी सातारा फेस्टीव्हल 2019 चे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशीच्या युवोत्सव या गीत आणि नृत्यांच्या कार्यक्रमात सातारकर सरिकांनी विविध गाण्यांवर ठेका धरला तर, दुसर्या दिवशीच्या झी मराठी वाहिनीवरील चला हवा येवू द्या या कार्यक्रमाने सातारकरांना हास्यकल्लोळात बुडवले.
दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांसाठी हजारो सातारकरांनी प्रचंड गर्दी केल्याने सलग दोन दिवस जिल्हा परिषद मैदान गर्दीने फुलून गेले होते. दि. 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता ख्यातनाम गायक आदर्श शिंदे यांचा बहुचर्चित युवोत्सव हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात आदर्श शिंदे यांच्यासह विशाल साजन आणि रामानंद यांनी विविध गाणी सादर करुन आपल्या मधुर आवाजाने सातारकरांना मंत्रमुग्ध केले तर, संस्कृती बालगुडे, पुजा सावंत, सई लोकुर, श्रृती मराठे, माधुरी पवार, किन्नरी दामा, रुतुजा राने यांनी आपला नृत्याविष्कार सादर करुन उपस्थितांना थिरकायला लावले. जवा नवीन पोट हा या गाण्यावर तर, खुद्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही युवकांसोबत नाचण्याचा मोह आवरता आला नाही. याच कार्यक्रमात प्रियदर्शन जाधव, कमलाकर सातपुते, योगेश सिरसाट आणि हेमांगी कवी आदी विनोदवीरांनी तुफान हास्याचे कारंजे उडवले.
दुसर्या दिवशी म्हणजेच सोमवार दि. 6 रोजी सातारा फेस्टीव्हलमध्ये झी मराठी वाहिनीवरील चला हवा येवू द्या च्या कलाकारांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. चला हवा येवू द्या हा कार्यक्रम असल्याने जागा मिळणार नाही, या भितीपोटी हजारो श्रोत्यांनी सायंकाळी 5 वाजल्यापासूनच कार्यक्रमस्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली. सायंकाळी 7 च्या सुमारास जिल्हा परिषद मैदान गर्दीने तुडूंब भरुन गेले होते. कार्यक्रमात चला हवा येवू द्या मधील निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश सिरसाट, श्रेया बुगडे आणि अंकुर वाढवे यांनी धमाल करुन सातारकरांना हास्यकल्लोळात बुडवले. यावेळी रम्पाट चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. रम्पाट चित्रपटातील कलाकारांसह अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी आदी सिने अभिनेते आणि झी वाहिनीवरील लागिरं झालं जी या मालिकेतील कलाकार उपस्थित होते. सातारा फेस्टीव्हलचे श्री. छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने नेटके नियोजन करण्यात आले हातेे.
मात्र, चला हवा येवू द्या पाहण्यासाठी गर्दीचा उच्चांक झाल्याने जिल्हा परिषद मैदानासमोरील रस्ताही गर्दीने खचाखच भरुन गेला होता.
सातारा फेस्टीव्हलमुळे सलग दोन दिवस सातार्यात हास्यकल्लोळ
RELATED ARTICLES