सातारा : शहरातील प्रभाग क्र. 9 मधील पालिकेच्या मालकीच्या जागेतील शौचालय पाडल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा असा तक्रारी अर्ज सातारा नगर पालिकेने शाहुपूरी पोलीस ठाण्यात दिला आहे.
शनिवार पेठेतील सि.स.नं. 1012 लगत असणार्या जागेत न.पा.च्या मालकीची दोन पुरूष व दोन महिला या प्रमाणे सार्वजनिक शौचालय होते. सदरचे शौचालय अज्ञात व्यक्तीने पाडले असल्याचे पालिकेच्या निदर्शनास सर्वसाधारण सभेत नगर सेवक कल्याण राक्षे यांनी आणून दिले. यावेळेस हे शौचालय एका बिल्डरने पाडले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता. सदरचे शौचालय अंदाजे 6 लाख रू. किमतीचे असून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी राक्षे यांनी केली होती. यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे स्थावर मालमत्ता विभागाला संबंधित ठिकाणी जाऊन पहाणी करण्याचे आदेश दिले. संबंधित विभागाने शनिवार पेठेत जाऊन शौचालयाची पहाणी करून त्याचा अहवाल मुख्याधिकार्यांना सादर केला. त्यांनी तात्काळ अज्ञात व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करावे. असे स्थावर विभागाचे सुर्यकांत भोकरे यांना सांगितले. त्यानुसार भोकरे यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात नगरपालिकेचे नुकसान झाल्याप्रकरणी अज्ञाताविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल व्हावा यासाठी तक्रारी अर्ज दिला.