प्रस्ताव पाठवणार असल्याची नांगरे-पाटील यांची माहिती
सातारा (अमित वाघमारे) : वाई हत्याकांडात योग्य तपास करुन सहा गुन्हे उघडकीस आणणार्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीमुळे बेस्ट डिटेक्शन अॅवॉर्डसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. तसेच तपास करणार्या टीमला 15 हजाराचे बक्षीस जाहीर केले असल्याचे यावेळी सांगितले.
संपूर्ण राज्यात खळबळ निर्माण करणारे वाई हत्याकांडात तथाकथित डॉक्टर संतोष पोळ याला ताब्यात घेवून मंगल जेधे खून प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या चाणाक्ष नजरेत संतोष पोळ याच्या क्रूकर्माचा पाढाच बाहेर काढला. तब्बल सहा खूनाचे उकल स्थानिक गुन्हे शाखेने केली. यामुळे संतोष पोळ सारखा कोल्ड ब्लडेड सिरियल किलर बाहेर आला. या आरोपीने प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळी हत्यारे वापरुन आपला डाव साधला. स्थानिक गुन्हे शाखा तपास करत असताना संतोष पोळ हा एका प्रश्नावर पाच ते सहा वेगवेगळी उत्तरे देत असल्याने तपासात अनेकवेळा अडचणींना पोलिसांना सामोरे जावे लागले. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या अशा भूलथापांना बळी न पडता योग्य तो धागा पकडून त्याला जेरीस आणले. या उत्कृष्ठ तपासावर कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी तपास करणार्या टीमचे अभिनंदन करत 15 हजाराचे बक्षिस जाहीर केले. तसेच महाराष्ट्रात अशा गुंतागुंतीचा गुन्हा सोडवणार्या टीमसाठी बेस्ट डिटेक्शन अॅवार्ड दिला जातो. या अॅवार्डसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती नांगरे पाटील यांनी दिली आहे.
वाई हत्याकांडात आरोपी संतोष पोळ याच्यावर खून प्रकरणात सहा स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आज संतोष पोळ याच्या घराची झडती घेवून वैद्यकीय व्यवसायाच्या अनुषंगोन प्रमाणपत्र प्राप्त झाले असून त्याची पडताळणीही पोलिस करत आहेत.