पाटण : उरूल घाटात शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ये-जा करणार्या दुचाकीसह वाहन धारकांना बिबट्याचा चांगलाच थरार अनुभवयास मिळाला. बिबट्याने अनेक वाहन धारकांना लक्ष्य करत पाठलाग केल्याने दुचाकी चालकांची पाचावर धारण बसली होती. त्यामुळे वाहन धारकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याने काही दुचाकीस्वारांना ताणून लावल्याने या मार्गावरील वाहतूक जवळजवळ एक तास ठप्प झाली होती. अखेर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पाहणी करून वाहन धारकांना सोडण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, उंब्रज-पाटण मार्गावर उरूल घाटाच्या खालून येणार्या पहिल्याच वळणावर शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सतीश सुर्यवंशी या दुचाकीस्वराच्या पाठीमागे बिबट्या लागला होता. तसेच उंब्रजकडे निघालेले रोहित हिरवे, अजय भिसे व मल्हारपेठ येथे भजनाच्या कार्यक्रमासाठी निघालेले बोडकेवाडीचे सरपंच डॉ. आण्णासाहेब देसाई यांच्या चारचाकी वाहनाच्या हा बिबट्या आडवा गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घाटातून जाणार्या दुचाकी धारकांना घाट ओलांडून जाण्यास मज्जाव केला. तद्नंतर याबाबतची माहिती सरपंच आण्णा देसाई यांनी दूरध्वनीवरून वनविभागाच्या अधिकार्यांना दिली. वनविभागाचे वनरक्षक घावटे व वनपाल रमेश कदम, महादेव कदम हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी बिबट्याचा वावर असणार्या ठिकाणी जावून पाहणी केली.
गेल्या चार-पाच महिन्यापासून विहे डोंगरपठारापासून ते मल्हारपेठ परिसराच्या पट्ट्यात बिबट्याचा वावर असून हा तरस असल्याचे वनविभाग सांगून वेळ मारून नेत आहे. हा बिबट्याच असल्याचे स्वत: वनविभागाच्या अधिकार्यांनी पाहिल्यावर त्यांच्या सांगण्याचा सूर मात्र बदलला. कारण या अगोदर मल्हारपेठ येथील डुरा नावाच्या शिवारात तसेच वनारसे रुग्णालयाच्या परिसरात व ठोमसे येथील लाट्या माळ या शिवारात दोन बिबटे दिसले असताना हा पण तरस असल्याचा जावईशोध वनविभागाने लावला होता. मात्र हा वनविभागाचा विरोधाभास कशासाठी? आतातरी या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग काय हालचाल करणार? बिबट्या एका रात्रीत 100 किलोमीटर अंतर असणार्या जंगलात जातो. कोठे पिंजरा लावायचा असे उत्तर वनविभागाकडून ऐकावयास मिळत आहे.
ज्या ठिकाणी हा बिबट्या दिसला त्याठिकाणी मृत पावलेली जनावरे उघड्यावरच टाकली जातात. तिथे गावठी कुत्र्यांचा सतत वावर असतो. मृत पावलेली जनावरे टाकण्याची जागा ही वन विभागाच्या हद्दीत येते. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणाकडे जाण्यासाठी मज्जाव करण्यासाठी मागणी होत आहे. कारण ही गावठी कुत्री दिवसाढवळ्या वाहनांच्या मागे लागत आहेत. या जागेबाबत वनविभागाने ठोस पावले उचलण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.