(अजित जगताप)
सातारा दि: गतिमान सरकार,, महाराष्ट्र सरकार अशी स्तुतीसुमने सरकार दरबारी वाचण्यास मिळतात. त्याची प्रात्यक्षिक सातारा जिल्ह्यात अनेकदा पाहण्यास मिळाले आहे. साताऱ्यातील चक्क एस.टी. विभागाच्या कार्यशाळा व भांडार विभागात पावसाचे पाणी आपल्या दारी आले आहे. साचलेल्या पाण्याने जल पर्यटन करण्याचा पहिला मान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळाला आहे. या जल पर्यटनामुळे जावळी तालुक्यातील मुनावळे सुद्धा फिके पडले आहे.
सर्वसामान्य माणसांची लालपरी म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. बस आहे. या एस.टी. बसने ग्रामीण भागातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शैक्षणिक संस्थेपर्यंत ये – जा करण्यासाठी खास सवलत दिली . आज अनेक क्षेत्रांमध्ये बहुजन समाजाची मुलं चमकत आहे. काही थेट मंत्रालयात बसलेले आहेत. क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यात क्रांतीकारक होऊन गेले. यावर अलीकडे युवा पिढीला विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. कारण, आता सत्ताधारीकारक बनलेले जनतेसाठी डोक्याला कारच झालेले आहेत.
सातारा जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या सातारा येथीलच भांडार विभाग व कार्यशाळा कार्यालयातच पावसाच्या पाण्याने दैना केलेली आहे. या ठिकाणी एस.टी.बसच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुट्टे भाग जड असल्यामुळे ते पाण्यात तरंगू शकले नाहीत. परंतु, त्यांना गंज नक्कीच लागणार याची आता खात्री पटू लागलेली आहे. पाच ते सहा लाख रुपयाचे साहित्य या ठिकाणी आहे. त्यापेक्षाही एस.टी. कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट आहे.
सध्या वाढती बेरोजगारी व खाजगी क्षेत्रात कमी वेतन असल्यामुळे जे काय एसटी महामंडळात नोकरी आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी एसटी कर्मचारी त्रास सहन करत आहेत. या विभागातील अनेक कामगार मलेरिया, डेंगू व हिवताप, साथीचे रोग याची पर्वा न करता काम करत आहेत. त्यांच्या समस्यावर तोडगा कधी निघणार हा मोठा प्रश्न आहे? अजून पर्यंत याची माहिती सातारा जिल्हा पालकमंत्र्यांना नसल्यामुळे ते माहिती घेऊन आचारसंहितेच्या अगोदर काम करतील. यावर आता विश्वास ठेवायला प्रवासी सुद्धा तयार नाहीत.
सातारा एस टी महामंडळाच्या कार्यशाळा व भांडार विभागातील सुट्ट्या भागाचे कपाटावर व खाली सध्या अस्तव्यस्त साहित्य पडलेले आहे. ज्या टेबलवर नियोजन करायचे असते. त्याच टेबलवर खुर्चीवर पाय ठेवून काम करावे लागत आहे. ही सत्तेच्या खुर्चीसाठी धडपडणाऱ्या राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे. सदर कार्यशाळेची इमारत खोलगट भागात असल्यामुळे पावसाचे पाणी आत शिरले. त्यामुळे असे घडले असले तरी १९६० साली ही इमारत बांधलेली आहे. आतापर्यंत अनेकदा पाऊस पडला. भूकंपाची धक्के बसले. पण, कधीही अशी अवस्था झाली नाही. सध्या राजकारणातील स्थिती बिघडल्यामुळे आता निसर्ग सुद्धा आपली करमत दाखवत आहे. आता काही प्रसार माध्यमाने हा प्रश्न उचलून धरल्यामुळे दोन दिवसांमध्ये साठलेले पाणी बाहेर काढण्यात येईल. पण, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचा चिखल काढणे शक्य आहे काय ? यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. दरम्यान, या ठिकाणी असलेल्या सर्व एस.टी. कामगारांची आरोग्याची तपासणी करावी. अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे व सामाजिक कार्यकर्ते यांनी केले आहे.
……………………………
फोटो सातारा एसटी महामंडळाच्या भांडार व कार्यशाळा विभागात झालेले दैना (छाया- अजित जगताप, सातारा)
साताऱ्यात एस.टी. भांडार विभागात मोफत जल पर्यटन…
RELATED ARTICLES