सातारा : नगराध्यक्ष निवडीनंतर विषय समित्यांच्या निवडीमध्ये खा. उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा चोखंदळपणा दाखवत पाच वर्षे बाजुला राहिलेल्या कट्टर समर्थकांना विषय समित्यांच्या सभापतीपदी वर्णी लावत सातारा विकास आघाडीची सत्ता सातारा पालिकेत बळकट करण्याचा प्रयत्न केला. ज्या कार्यकर्त्यांना काही कारणास्तव विजनवासात जावे लागले. त्यांचे पुनर्वसन उदयनराजे यांनी करत संतुलन साधल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती.
सोमवारी झालेल्या पालिकेच्या सभेमध्ये तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी दुपारी 1.30 च्या दरम्यान या निवडींची औपचारिक घोषणा केली. यामध्ये आरोग्य सभापतीपदी वसंत लेवे, पाणीपुरवठा सभापती पदी सुहास राजेशिर्के, बांधकाम सभापती किशोर शिंदे, महिला बालकल्याण सभापती पदी सविता फाळके, उपसभापतीपदी स्मिता पवार, नियोजन व विकास सभापतीपदी अल्लाउद्दीन शेख तर शिक्षण मंडळाच्या पदसिध्दसभापतीपदी उपनगराध्यक्ष राजू भोसले यांची वर्णी लागली. सातारा पालिकेच्या स्थायी समितीत नगर विकास आघाडीकडून रविंद्र ढोणे यांना पाठविण्यात आले. या निवडीची प्रक्रिया सकाळी 11 वाजल्यापासूनच सुरू झाली होती. नामनिर्देशन पत्रे मुख्याधिकार्यांकडे सादर केल्यानंतर छाननी व अर्ज मागे घेणे या प्रक्रिया पार पडल्या. पीठासन अधिकारी नीलप्रसाद चव्हाण यांना या प्रक्रियेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या. सर्व सभागृहांनी नुतन सभापतींचे बाके वाजवून स्वागत केले. नगराध्यक्षा माधवी कदम व उपनगराध्यक्ष राजू भोसले यांनी नुतन सभापतींचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. उदयनराजे भोसले यांनी सभापतींच्या निवडीमध्येही राजकीय संतुलन साधले. एक टर्म नगरपालिकेबाहेर राहिलेल्या विद्यमान नगरसेवकांना पुढे आणून त्यांना ताकद देण्याची रणनिती उदयनराजेंनी स्पष्ट केली.