सातारा ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर करुन 50 दिवस झाले तरीही सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन ते वाढेफाटा असा बैलगाडीतून मोर्चा काढून महामार्गावर रास्तारोको करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदींचा निर्णय घेतल्यानंतर नोटा बंदीमुळे सर्व सामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अजूनही बँकांमध्ये गर्दी, एटीएम सेंटरमध्ये गर्दी असून याची झळ सर्वसामान्यांना बसत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी राज्यभरात आंदोलनची हाक दिली. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आंदोलन करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आ. शशिकांत शिंदे यांनी आंदोलनाची जबाबदारी प्रत्येक तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींवर असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी जिल्ह्यात राष्ट्रवादीतर्फे सर्व तालुक्यात रास्ता रोको, निरदर्शे व मोर्चे काढण्यात आले.
सातार्यात राष्ट्रवादी भवन ते वाढे फाटा असा बैलगाडीतून मोर्चा काढण्यात आला. यावेळी सातारा व जावली तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने जरंडेश्वर नाका परिसरात मोर्चा आडवला. यावेळी मोर्चास संबोधीत करताना आ. शशिकांत शिंदे म्हणाले, नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात आवाज उठवणार्यांना अटक व त्यांची चौकशी केले जाते. लोकशाहीत निषेध नोंदवला तरी हुकमशाही व हिटलरशाही प्रमाणाने विरोधकांना वागणूक देत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे काळापैसा बाहेर न काढता काळ्या पैशाचे पांढर्या पैशात रुपांतर करण्याचा सरकारचा डाव होता.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, नोटाबंदीच्या निर्णयात सहकारी बँकावर निर्बंध घालून सहकारी चळवळ मोडीत काढण्याचे सरकारचे धोरण होते. त्याचबरोबर देशात आदर्श अशा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची चार वेळा चौकशी केली. अशा प्रकार ग्रामीण भागातील शेतकरी व सहकारी चळवळ अडचणीत आणण्याचे काम सरकार करत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गास सहकारी बँकांकडून उद्योगपतींच्या खाजगी बँकांकडे वळवण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांच्या नोटाबंदीमुळे बाजारपेठा ठप्प आहे. उद्योग-धंदे बंद पडत आहे आणि सर्वसामान्य शेतकरी कर्जबाजारी होत आहे. त्याच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे.
त्यानंतर मोर्चा महामार्गाकडे वळाला. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी काहीवेळ महामार्ग रोखून धरला. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. यामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले, सुनील माने, नितीन भोसले, जिप सदस्य किरण साबळे-पाटील, राजू भोसले, सतीश चव्हाण, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.