

दोन दिवसांपूर्वी रा.स.प. चे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत व भाजपाचे सोलापूरचे आ. सुभाषबापू देशमुख या तिघांचा विस्तारीत मंत्रीमंडळात समावेश झाला. यापैकी श्री. जानकर हे माण तालुक्यातील पळसावडे गांवचे रहिवाशी आहेत. त्यांच्या रुपाने माण तालुक्यास पहिल्यांदाच मंत्र्याच्या रुपाने लाल दिवा मिळाला आहे. त्यांनी सात वर्षापूर्वी माढा मतदारसंघातून तत्कालीन केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्याशी लढत दिली होती. यावेळी त्यांना तिसर्या क्रमांकाची मते मिळाली होती. या मतामध्ये माण-खटाव तालुक्यासह मतदारसंघातील धनगर समाजाच्या मताचा मोठा वाटा होता.
दोन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत नवख्या सदाभाऊ खोतांनी माजी उपमुख्यमंत्री असणार्या विजयसिंह मोहिते-पाटील यांना जोरदार टक्कर दिली होती. ऐनवेळी माळशिरसमधील सर्वपक्षीय कार्यकत्यांनी मतभेद विसरुन दादांना हात दिल्यामुळेच मोहितेंची नौका पैलतराला लागली. या निवडणूकीत सदाभाऊंना खटाव-माणसह माढा, करमाळा या दुष्काळी पट्याने चांगला हातभार लावला होता. तर जानकर यांच्या प्रमाणेच सात वर्षापूर्वी सोलापूरच्या सुभाषबापू देशमुख यांनी पवार साहेबांशी चांगली लढत दिली होती. या निवडणूकीत भले बापू सोलापूरचे असले तरी त्यांनी पवार साहेबांच्या उपर्या मतदारसंघावरुन प्रचाराची चांगलीच राळ उडविली होती. सुभाष बापूंनाही फलटण वगळता अन्य तालुक्यातून चांगली साथ मिळाली होती.
आजच्या परस्थितीत माढा मतदारसंघातील काही विधानसभा मतदारसंघ तसेच काही ठिकाणचे जिल्हा परिषदेचे मतदारसंघ महायुतीसाठी पोषक आहेत. यामध्ये माण विधानसभा मतदारसंघ, त्याचबरोबर या मतदारसंघातील दहिवडी, म्हसवड, वडूज ही नगरपालीका क्षेत्रे यांचा समावेश आहे. दुष्काळ व शेती-पाणी प्रश्न ही मतदारसंघातील बहुतांशी भागाची समान अडचण आहे. या संदर्भात जाणकर साहेब व सदाभाऊंनी यापूर्वी तत्कालीन प्रस्थापित शासना विरोधात उपोषण, मोर्चा अशा प्रकारची वेगवेगळे आंदोलने केली होती. या आंदोलनात त्यांना मोठा संघर्षही करावा लागला होता. याची जाणीव ठेवून मंत्री महोदयांनी दोन्ही प्रश्नांना कायमस्वरुपी मुठमाती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वरील तिन मंत्री महोदयांनी एकत्र येवून शिस्तबध्द कार्यक्रम राबविला तर मतदारसंघातील कायम उपेक्षित असणार्या महायुतीच्या कार्यकत्यांना अच्छे दिन येतील असा सुर निघत आहे.