महाबळेश्वर : येथे कोसळत असलेल्या पावसाचा जोर कायम असून आजही येथे मुसळधार पावसाच्या धारा बरसत आहेत रमजान ईद झाल्यामुळे तसेच विकेंड असल्याने वर्षा सहलीसाठी पर्यटकांनी येथे गर्दी केली आहे.
मुसळधार पावसामुळे वेण्णालेक तुडुंब भरले असून त्याच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे हेच पाणी महाबळेश्वर-पांचगणी रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा होत आहे. या पाण्यातून वाट काढत धीम्या गतीने वाहतुक सुरू आहे. सांडव्यावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे पर्यटक वेण्णालेककडे आकर्षित होत असून तेथे मोठ्या संख्येने पर्यटक पावसाचा आनंद घेत आहेत. आज सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत येथे दोन इंच म्हणजेच 52.2 मि मि पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जुन ते आज सायंकाळी साडेपाच पर्यंत येथे एकुन 1575 मि मि पावसाची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील ओढे, नाले दुथडी भरून वाहत असल्याने महाबळेश्वरच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या अनेक धरणांच्या पाणी साठ्यात झपाटयाने वाढ होत आहे. महाबळेश्वरच्या पश्चिम भागात भात लागणीला साठी शेतामध्ये चिखल करण्याच्या कामाला वेग आला आहे शहर व परिसरात तरूणाई पावसात भिजुन वर्षा सहलीचा आनंद लुटत आहे.
पावसात चिंब भिजल्या नंतर चौकात गरमा गरम मक्याचे कणीस व गरमा गरम भजी कडक चहा यांचा आस्वाद घेत आहेत महाबळेश्वरकडे येत असलेल्या सर्वच रस्त्यांवर धुक्याचे साम्राज्य असल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे पावसाला सुरूवात झाल्या पासुन महाबळेश्वर पांचगणी रस्त्यांवर वरचेवर अपघात घडत आहे. वातावरणात थंडीही चांगलीच आहे पर्यटनाला येताना ज्यांनी गरम कपडे आणली नाही अशी मंडळी सोबत असलेल्या वृध्दांसाठी व मुलांसाठी वाजारात गरम कपड्यांची खरेदी करताना दिसत आहेत. दाटधुके व वाहनांची गर्दी या मुळे शहराकडे येत असलेल्या सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे पर्यटकांचा आवडता ऑर्थरसीट हा पॉइर्ंट वन विभागाने बंद केला असल्याने अनेक पर्यटक हे केटस् पॉइर्ंट व क्षेत्र महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदीर पाहण्यासाठी आवर्जुन जात आहेत तसेच वेण्णालेक नौकाविहाराची सोय असून तेथे असलेल्या चौपाटी कडेही अबालवृध्द आकर्षित होत आहेत. मुसळधार पऊस असला तरी कोठेही वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही