सातारा : सातारा- विलासपूरला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळल्यानंतर या परिसराचा झपाट्याने विकास झाला आहे. ग्रामपंचायतीने लोकहिताचे विविध उपक्रम आणि योजना राबवून अल्पावधीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. विलासपूर एक आदर्श गाव आणि ग्रामपंचायत निर्माण करण्यासाठी आपण सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
विलासपूर (ता. सातारा) येथे ग्रामपंचायतीला 14 व्या वित्त आयोगातून मिळालेल्या 10 लाख 36 हजाराच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या डस्टबीनचे ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. धनश्री महाडीक, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमुहाचे अध्यक्ष फिरोज पठाण, विलासपूरचे सरपंच बाळासाहेब पिसाळ, उपसरपंच महेश कुलकर्णी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा शहरालगत विलासपूर ग्रामपंचायत आहे. शहराप्रमाणेच याही गावाचा विकास झाला पाहिजे. विविध सोयी- सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केला आहे.
गावातील प्रत्येक भाग स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून ग्रामस्थांना डस्टबीन उपलब्ध करुन दिल्याने घरातील कचरा अस्ताव्यस्त न पडता डस्टबीन मध्ये जाणार आहे. त्यामुळे या कचर्याची योग्यप्रकारे विल्हेवाटा लावली जाणार असल्याने विलासपूर हे एक स्वच्छ आणि सुंदर गाव होण्यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.