सातारा (अतुल देशपांडे यांजकडून) : अशी ही सातार्याची तर्हा या म्हणीची उक्ती सातारकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. सातारचे जिल्हाधिकारी कार्यालय संपूर्ण राज्यात वेगळ्या पध्दतीने प्रसिध्द आहे ते म्हणजे इथे रोज घडणार्या मोर्चा, निषेध आंदोलन, बेमुदत धरणे आणि आमरण उपोषणासह ठिय्या आंदोलनाने.
बुधवारची दुपार मात्र अशाच ऐका अनोख्या पध्दतीने करण्यात आलेल्या आंदोलनाने गाजली. शेतकर्यांची कर्जे माफ करा. बैल गाडी शर्यतीला पुन्हा मान्यता द्या, पेटा संघटनेवर बंदी आणा यासह आपल्या न्याय मागण्यासाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या साखर आळीत राहणार्या विजय जाधव या शेतकर्याने चक्क जिल्हाधिकारी कार्यालयापुढील उंचच उंच झेंड्यावर चढत आपली घोषणाबाजी सुरु केली. सुमारे साडेअकराची ही रणरणत्या उन्हाची वेळ, हा प्रकार तातडीनेे परिसरातील बघ्यांनी पोलिसांना कळविला मात्र मी माझे आंदोलन न्याय मिळेपर्यंत मागे घेणार नाही असे म्हणत झेंड्यावर चढलेल्या जाधवने झेंड्याला सलाम करत मी माझे बरेवाईट करुन घेतो. मात्र राष्ट्रध्वजाला ठेच लागू देणार नाही असा पवित्रा घेत हातातील रॅाकेलची बाटली दाखवायला सुरुवात केली.
पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील व त्यांच्या पोलीस चमुने भर उन्हात जाधव खाली या आपले आंदोलन थांबवा असे वारंवार सांगुनही चाललेला हा प्रकार एकच्या सुमारास जाधव यांनी आटोपता घेतला. त्यानंतर गळ्यात निषेध फलक घेवून नारेबाजी करणार्या जाधवांनी राष्ट्रध्वजाला नमस्कार करीत कार्यालयाच्या भिंतीच्या आडोशाला बसकण मारली. झेंड्यावरुन खाली उतरलेल्या जाधवांना ताब्यात घेण्याचा निर्णय अखेर पोलिसांनी घेतला. त्यावेळी हातपाय झाडत जाधवांनी अटकेसाठी प्रतिकार केला. मात्र सहाजणांच्या बळापुढे जाधव नरमले आणि त्यांनी उचलबांगडी पोलीस जीपमधून पोलीस ठाण्यात करण्यात आली.
दररोज घोषणा आणि निदर्शनानी गाजणारा हा परिसर आज मात्र पत्रकार, छायाचित्रकार आणि पोलिसांसाठी एकट्या आंदोलकामुळेही मोठ्या तापाचा ठरला.
शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी एका सैरभैर शेतकर्याचे अनोखे आंदोलन ; पोलीस प्रशासनाची भर उन्हात भंबेरी
RELATED ARTICLES