Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीफलटण येथील प्रभू श्रीराम रथोत्सव उत्साहात

फलटण येथील प्रभू श्रीराम रथोत्सव उत्साहात

 

फलटण: फलटणकरांचे आराध्य दैवत असलेल्या आणि संस्थानकाळापासून सुरु असलेली येथील प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली आज रथोत्सवाच्या मुख्य दिवशी दर्शनासाठी भाविकानी मोठी गर्दी केली होती.
नाईक निंबाळकर राजघराण्यातील साध्वी श्रीमंत सगुणामाता आईसाहेब यांनी सुमारे 200 वर्षांपूर्वी रथयात्रेची परंपरा सुरु केली ती आजही परंपरागत पध्दतीने सुरु आहे. दरवर्षी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी  प्रभू श्रीरामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. आज  सकाळी 8 च्या सुमारास रथखान्यासमोर राजघराण्यातील विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीराम, सीतामातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. फळे, फुले, पाने आणि विविधरंगी निशाणे लावून उसाच्या मोळ्या बांधून सजविलेला हा रथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. यावेळी राजघराण्यातील मंडळी, भाविक, मानकरी उपस्थित होते.
श्रीराम मंदिरापासून नगरप्रदक्षिणेसाठी निघालेल्या या रथाचे शिंपी गल्लीतून बारामती चौक मार्गे सिमेंट रोडने नगरपरिषद कार्यालयासमोरील चौकात आगमन झाले. रथयात्रा ज्ञानेश्वर मंदिर, डेक्कन चौक, म. फुले चौक, मारवाड पेठ मार्गाने बारस्कर चौकात तेथून रंगारी महादेव मंदिरापासून बाणगंगा नदीपात्रात तेथून मलठण भागातील हरीबुवा मंदिरापासून पाचबत्ती चौक, बुरुड गल्ली, छ. शिवाजी वाचनालय या मार्गाने सायंकाळी पुन्हा श्रीराम मंदिरात पोहोचला. या दरम्यान शहरातील रथ प्रदक्षिणेच्या मार्गावर ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आलेल्या अबालवृध्दांनी प्रभू श्रीरामाचे शहरात ठिकठिकाणी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. नगराध्यक्षा निता नेवसे, राष्टवादि काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनीही रथाचे स्वागत करून दर्शन घेतले
शहरवासियांनी रथमार्गावर सडा रांगोळ्या घालून प्रभू श्रीरामाचे स्वागत केले. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी थांबून शहर-वासीय आणि ग्रामीण भागातील तसेच परगावच्या भक्तमंडळींनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. या रथोत्सवासाठी बारामती, इंदापूर, पुरंदर, खंडाळा, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यातूनही भाविक मोठ्या संख्येने आले होते. त्याचप्रमाणे नोकरी व्यवसाया-निमित्त पुणे, मुंबई आणि अन्य शहरात असलेले येथील रहिवासीही आपल्या कुटुंबीयांसह रथयात्रेसाठी आणि प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी आले होते. रामरथोत्सवाच्या निमित्ताने येथे जवळपास 8/10 दिवस मोठी यात्रा भरते. त्या-मध्ये मेवा मिठाईची दुकाने, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, स्त्रियांची विविध आभूषणे, बांगड्यांच्या दुकानांची यात्रेत रेलचेल असते. त्याचबरोबर संसारोपयोगी साहित्य, कपडे यांचीही दुकाने थाटण्यात आली होती. विविध प्रकारची करमणुकीची साधने व खेळ,लहान मोठी पाळणे, रेल्वे, फिरती चक्रे आदी मनोरंजनाची व लहान मुलांचे आकर्षण ठरणारी साधनेही या यात्रेत दाखल झाली आहेत.कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आला होता दर्शनासाठी मोठ्या संखेने भाविक विविध ठिकानावरुन आले होते रथोत्सव निमित्त उद्या नगरपालिकेतर्फे कुस्ती स्पर्धांचे आयोजन  घडसोली मैदान येथे करण्यात आले आहे
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular