वडूज : गुरसाळे (ता. खटाव) येथील ग्रामदैवत श्री सोमेश्वराच्या वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानात कोल्हापूर येथील गंगावेश तालमीच्या योगेश बोंबाळे याने अंतिम कुस्तीत मोतीबाग तालमीच्या मारुती जाधव यास गुनावर मात करुन बाजी मारत दीड लाख रुपयांचे इनाम जिंकले. द्वितीय क्रमांकाच्या 1 लाख इनामाच्या कुस्तीत कुर्डुवाडीच्या सुनिल शेवतकरने पोकळ घिस्सा लावत काका पवार तालमीच्या संदिप काळेला अस्मान दाखविले. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत नागाचे कुमठे येथील पांडुरंग मांडवे याने खवसपूरच्या औदुंबर मासाळला पोकळ खिस्यावर चितपट केले. मांडवे यास 75 हजाराचे इनाम देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाच्या कुस्तीत मोतिबाग तालमीच्या राजाराम यमगरने भोसले व्यायामशाळेच्या रामदास पवार चा ङ्ग निकाल म डावावर निकाल लावला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत अकलूज येथील शिवनेरी तालमीच्या सचिन केचे याने भोसले व्यायामशाळेच्या प्रशांत शिंदेवर मात केली. श्री. यमगर व केचे या दोघांना प्रत्येकी 51 हजार रुपयांचे इनाम देण्यात आले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत मुरगुड तालमीच्या सोन्या सोनटक्केने भोसले व्यायामशाळेच्या धीरज पवारला गदालोट डावावर अस्मान दाखवले. विकास जाधव गुरसाळे व संग्राम साळुंखे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. शंकर पुजारी, राजेंद्र जगदाळे यांनी कुस्त्यांचे धावते समालोचन केले. विकास जाधव, मारुती जाधव, अनिल शेंडगे यांनी पंच म्हणून काम पाहिले. कुस्ती आखाड्याच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमेटीचे अध्यक्ष विष्णू मांडके, उपाध्यक्ष भानुदास जाधव, कुस्ती कमेटी अध्यक्ष मारुती जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र इंगळे, वसंतराव जाधव, संतोष जाधव, साहेबराव पाटोळे आदिंसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सोमेश्वराचा वार्षिक रथोत्सवही उत्साहात साजरा झाला. चालू वर्षी भाविकांनी रथावर सुमारे साडेपाच लाखाची देणगी अर्पन केली. यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणावर मेवा, मिठाईची दुकाने, खेळणे-पाळणे आली आहेत. रथोत्सव व कुस्ती मैदानास गावातील चाकरमाने, गलाई व्यवसायिक यांनी आवर्जुन हजेरी लावली होती.