सातारा : पायाभूत सुविधांचे शुल्क महाग करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार्या सातारा पालिकेने झारीतले शुक्राचार्य शोधायला सुरवात केली आहे. शाहूकला मंदिर भाडयाच्या वसुलीत अनियमितता आढळल्याने मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी दोघांना नोटीस बजावली आहे. लिपिक व विभाग प्रमुखांना वसुली संदर्भात खुलासा करण्याचे फर्मान बजावण्यात आले आहे. नोटीस नाट्यानंतर खुलासा करून एकमेकांवर जवाबदारी ढकलण्याची स्पर्धा सुरू झाल्याने शाहू कला मंदिराला गळती कुठे लागली हेच तपासण्याची वेळ आली आहे.
उत्पन्न वाढीचे अनेक पर्याय उपलब्ध असताना नियमित करदात्यांवर सत्ताधार्यांनी महागाईचे अंदाजपत्रकातून रितसर बिल फाडले पालिकेच्या उत्पन्न स्त्रोतापैकी शाहू कला मंदिर हा एक प्रमुख स्त्रोत आहे मात्र येथे होणारे कार्यक्रम आणि त्यापेक्षा त्याची होणारी वसुली यामध्ये प्रचंड अनियमितता असल्याची ओरड अंदाजपत्रक सादर होण्यापूर्वी झाली होती. स्थावर जिंदगी विभागाचा प्रमुख असणारा सूर्यकांत भोकरे व लिपिक खटावकर यांचा कारभार पालिकेने कारवाईच्या रडारवर घेतला आहे.
मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी भोकरे यांना तब्बल दोन पानाची नोटीस बजावली असून त्यामध्ये अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत वसुलीची अनियमितता व याशिवाय स्थावर जिंदगीच्या रेकॉर्ड वरून गायब झालेल्या मोकळ्या जागा या सार्याचा हिशोब मागण्यात आला आहे शाहू कला मंदिराची देखभाल करणारे खटावकर यांनाही चौकशीच्या पिंजर्यात उभे करण्यात आले आहे. मनोमिलनाच्या काळात शाहू कला मंदिराच्या अद्ययावती करणासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते मात्र इतके सारे करूनही महसूल वाढीला पालिकेतल्याच काही कर्मचार्यांनी चुना लावला त्यामध्ये स्थावर जिंदगी विभाग कळीचा नारद ठरला. पालिकेच्या वतीने भोकरे यांनीच करार करायचे आणि मुख्याधिकार्यांना न विचारता आपणच सही ठोकायची या प्रकारामुळे गेल्या दोन वर्षात शाहू कला मंदिराच्या वसुलीचा ताळेबंद जुळेनासा झाला आहे.
पालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षणात काही गोष्टी उघड झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. आपल्या गळयाला फास लागणार हे लक्षात आल्यावर भोकरे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देउन पळ काढण्याचा प्रयत्न केला होता , मात्र त्यांच्याकडे प्रलंबित असणारी वादग्रस्त प्रकरणे यामुळे त्यांचा अर्ज फेटाळ्ण्यात आला होता . त्यामुळेच त्यांना चौकशीच्या रडारवर घेण्यात आले . करंजे एमआयडीसीत 60 भूखंडाच्या जागा हस्तांतरणात असाच घोळ घालण्यात आला आहे तिथेही भोकरे महोदयांनी च त्यांचे सुपीक डोके चालवून बरेच काही साधल्याची चर्चा आहे.
भोकरे यांनी मुख्याधिकार्यांनी जी नोटीस बजावली त्याचा इन्कार केला आहे तो मी नव्हेच असा लखोबा स्टाइल त्यांनी पवित्रा घेतला आहे . भाडे वसुलीच्या अनियमिततेला मी जवाबदार नाही असा त्यांचा दावा असून सारे काही वरिष्ठांच्या सूचनेनुसार झाल्याचे त्यांनी खुलाशात नमूद केल्याचे खात्रीशीर वृत आहे. खटावकर यांनाही नोटीस बजावण्यात आल्याने त्यांचाही रक्तदाब अचानक वाढला. त्यांनी खुलाशामध्ये भोकरे यांच्याकडेच अंगुलीनिर्देश केल्याने पाण्यातला खरा मासा कोणं हे लक्षात येउ लागले आहे .
सीओ साहेब कारभारावर लक्ष तरी ठेवा…….
मुख्याधिकारी शंकर गोरे यांचा प्रशासनावर कोणताच वचक नसल्याची खासगीत खसखस आहे. सूत्रे जर पडद्याआडून हलवली जात असतील तर मुख्याधिकारी केवळ होयबाचे धनी ठरले आहेत प्रशासनाचा संपूर्ण रिमोट गोरे साहेबांच्या हाती असणे आवश्यक आहे मात्र साहेब स्वतःच दुसर्याच्या रिमोटने ऑपरेट होऊ लागल्याने कर्मचारी मोकाट झाले आहेत. त्यामुळेच स्थावर जिंदगी विभाग कोणाचेच नियंत्रण नसल्याप्रमाणे बेफाम सुसाटला आहे त्यामुळे साहेब कारभारावर लक्ष असू द्या असे सांगण्याची वेळ आली आहे.