ना. राजकुमार बडोले, बबन कांबळे,अविनाश महातेकर यांची उपस्थिती
सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आरंभ सातारा येथून झाला. 7 नोव्हेंबर 1900 रोजी त्यांनी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला. या दिनाचे औचित्य व महत्व विचारात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाच्या स्मृती जागवण्याच्या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळाप्रवेश दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाही हा सोहळा दिमाखात होणार असल्याची माहिती अरुण जावळे यांनी दिली.
सन 1900 ते 1904 या कालावधी दरम्यान त्यांचे बालपण साता-यात गेले. येथील ऐतिहासिक अशा राजवाड्याच्या भव्यदिव्य वास्तूत असणा-या सातारा हायस्कूल मध्ये ( सध्याचे छत्रपती प्रतापसिहराजे हायस्कूल ) 7 नोव्हेबर 1900 रोजी त्यांनी इयत्ता पहिलीच्या ( इंग्रजी ) वर्गात प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांचे नाव भीवा असे होते. हायस्कूलच्या रजिस्टरला 1914 या क्रमांकासमोर आजही बाल भीवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तावेज प्रशासनाने जपून ठेवला आहे. दरवर्षी या दिनाच्या निमित्ताने असंख्य लोक उपस्थित राहून ज्या मातीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलांचे ठसे उमटले त्या मातीला वंदन करतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शाळेत पाऊल पडलेच नसते तर ते सुशिक्षित व प्रज्ञावंत होणे शक्य नव्हते. महत्वाचे म्हणजे जगात ज्याचे आजही स्वागत केले जाते ते लोकशाहीप्रधान संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून निर्माण झाले नसते. परिणामतः मानवी स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक न्याय आणि मानवी मुल्यांची पावला पावला हत्या झाली असती. शिवाय शेकडो वर्षे जाती व्यवस्थेच्या एकदम तळाला गटांगळ्या खाणा-या माणसाचे प्राण वाचून त्याला माणूसपण मिळाले नसते. वंचित, उपेक्षितांवर दुःख – दैन्य – दारिद्रयाचे डोंगर कोसळतच राहिले असते. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश युगांतराची चाहूल देणारी व इतिहासाला कूस बदलावयास लावणारी क्रांतिकारक घटना आहे, असे अरुण जावळे यांनी म्हटले आहे.
मंगळवार दि 7 नोव्हेंबरला सकाळी डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात येणार आहे. समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदनाही दिली जाणार आहे. सायंकाळी 6 .30 वाजता छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे मुख्य सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. यादरम्यान आंबेडकर विचारधारा तळागाळात पोहचवणा-या परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम झाल्यानंतर पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, जेष्ठ पत्रकार बबन कांबळे, रिपाइंचे जेष्ठ नेते अविनाश महातेकर यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. रहाणार आहेत. यावेळी जेष्ठ साहित्यिक पार्थ पोळके, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती आहे. या कार्यक्रमासाठी सातारा परिसरासह जिल्यातील तमाम आंबेडकर अनुयायांनी उपस्थित रहावे असे आवाहन या सोहळ्याचे आयोजक पत्रकार अरुण जावळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनासंबधी घेतलेल्या निर्णय प्रक्रियेत अरुण जावळे यांना ज्यांनी मौलिक सहकार्य केले त्या ना. राजकुमार बडोले, बबन कांबळे, अविनाश महातेकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ना. बडोले यांनी या कार्यक्रमला उपस्थित रहावे यासाठी 26 सप्टेंबर 2017 रोजी मुंबई येथे जाऊन व लेखी पत्र देऊन अरुण जावळे यांनी विनंती केली होती. त्यावेळी होकार देऊन ना. बडोले यांनी अरुणजी आपण करत असलेले कार्य हे खूप आभिमानास्पद आहे असे उदगार काढून व पाठ थोपटून कौतुक केले होते.
7 नोव्हेंबरला डॉ. आंबेडकर शाळा प्रवेश दिनी भव्य विद्यार्थी दिवस सोहळा
RELATED ARTICLES