साताराः सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनांच्यावतीने आज शनिवारी दुपारी भव्य मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षकांबाबत घेतलेल्या अन्यायकारक निर्णयामुळे शासनाचे विरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता. प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटना या महामोर्चात सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे प्राथमिक शिक्षकांच्या या मोर्चाला जिल्हयातील राष्ट्रवादीचे आ.शशिकांत शिंदे, आ.बाळासाहेब पाटील, जि.प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आदींसह पाठिंबा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिक्षकांच्यावतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात न्याय मागण्यांबाबत शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली. यामध्ये राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत दाखल झालेले शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणेत यावी, राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि. 27 फेब्रवारी 2017 रोजी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या बाबत काढलेल्या अन्यायकारक शासन निर्णयात बदल करणेत यावा, प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी देणेबाबत 23 ऑक्टोबर 2017 रोजी काढण्यात आलेल्या अन्यायकारक शासन निर्णय त्वरीत रद्द करणेत यावा, प्राथमिक शिक्षकांना एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण होणेस मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, राज्यातील ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा उपलब्ध नसलेने शिक्षकांवर ऑनलाईन कामाची सक्ती करणेत येवू नये, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवणेत यावी, प्राथमिक शाळेतील 6 ते 14 वयोगटातील 100 टक्के विद्यार्थ्याना गणवेश देणे व गणवेशाची रक्कम शाहा व्यवस्थापन समितीलाच खर्चाची परवानगी देणे, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका शाळेतील विजबिलासाठी आर्थिक तरतूद करणे, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखांची पदे पदोन्नतीने भरणे, प्राथमिक शाळेला विनाअट मुख्याध्यापकाचे पद मंजूर करणे, प्रसूती रजेवर असलेल्या शिक्षिकेच्या जागेवर पर्यायी शिक्षकांची हंगामी नेमणूक करणे,संगणक प्रशिक्षणाबाबत विधानपरिषदेत दिलेल्या आश्वासनानुसार शासन निर्णय निर्गमीत करणे, आंतरजिल्हा बदलीबाबत त्वरीत नवीन धोरण जाहीर करणे यापूर्वी दिलेली आपसी बदलीचे प्रस्ताव मान्य करणे ज्यांना दोन्ही जिल्हा परिषदेकडून ना हरकत दाखला मिळाला आहे त्यांना त्वरीत कार्यमुक्त करणेत यावे, नगरपालिका महानगर पालिका शाळेतील शिक्षकांना गटविमा लागू करणे, नवीन प्राथमिक पदवीधर व विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी द्यावी, महानगरपालिका व नगरपालिकेतील शिक्षकांच्या वेतनासाठी राज्य शासनाने 100 टक्के निधी द्यावा, राज्यस्तरीय शिक्षकांचे रोष्टर लवकरात लवकर पूर्ण करावे आदी मागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस उदय शिंदे, संपर्कप्रमुख सिध्देश्वर पुस्तके, जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅक समिती अध्यक्ष शंकरराव देवरे, जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ, मच्छिंद्र मुळीक, दिपक भुजबळ, गणपत बनसोडे, विजय भोसले, रमेश लोटेकर आदी सहभागी झाले होते.
(छायाः प्रकाश वायदंडे)