सातारा : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्यावतीने शिक्षकांच्या रखडलेल्या बदल्या व अन्य प्रश्नाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुजींनी भव्य मोर्चा काढला.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व जि. प. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षकाच्या सर्वसाधारण बदल्यासंबंधी दि. 17 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयातील जाचक त्रुटी रद्द करण्यात याव्यात, सन 2005 नंतर सेवेत दाखल प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळावा, 7 व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी त्वरीत व्हावी, ऑनलाईन कामाकरीता सर्व शाळांना नेट कनेक्शन मोफत देण्यात यावे, महिलांच्या नावाखाली मागत असलेल्या कागदपत्रांची संस्था कमी व्हावी, एम. एस. सी. आय. टी. ला मुदतवाढ देण्यात येवून शिक्षकांची वसूली थांबवावी, मुख्याध्यापकांची पदे त्वरीत भरण्यात यावीत, सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर श्रेणी देण्यात यावीत, शालेय पोषण आहार स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवाव्यात, बांधकामातून शिक्षकांची सुटका करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांनी मोर्चा राजवाडा गांधी मैदान ते पोलीस मुख्यालय मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वयक समिती निमंत्रक उदय शिंदे, समन्वयक वसंतराव हरुगडे, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दिपक भुजबळ, पदवीधर प्राथमिक शिक्षक संग अध्यक्ष अनिल कदम, इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन अध्यक्ष गणपतराव बनसोडे, कास्ट्राईब शिक्षक संघटना अध्यक्ष प्रशांत मोरे यांनी केले होते. मोर्चात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते.
(छायाचित्र- प्रकाश वायदंडे)