सातारा : सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम निकृष्ट होत आहेच तथापि अत्यंत संथ होत आहे, त्यामुळे प्रवासी वाहनधारकांमध्ये प्रचंड असंतोष आहे, याप्रकरणी रिलायंसवर तातडीने ठोस कारवाई करावी अशी प्रमुख मागणी खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी केली, यावर केंंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्री ना.नितिन गडकरी यांनी रिलायंसवर आजच्या आज कारवाई करावी असे आदेश बैठकीमध्ये दिले.
केंद्रीय रस्ते निधी आणि राष्ट्रीय महामार्गाचे सुरु असलेल्या सहापदरणीकरण या विषयांवर केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री ना.नितिन गडकरी यांनी पुणे विभागातील लोकप्रतिनिधींच्या बोलावलेल्या विशेष बैठकीत खा.श्री.छ.उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, पुणे विभागातील सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे येथील मंत्री महोदय, संसद सदस्य, राज्य विधीमंडळ सदस्य आणि संबंधित यंत्रणेचे मुख्य अभियंते अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी बैठकीत भाग घेवून विविध विषयावर परखड मत व्यक्त करतानाच, राष्ट्रीय महामार्गाच्या चालु असलेल्या सहापदरीकरणाच्या कामांवर जोरदार आवाज उठवता सांगितले की, सहापदरीकरणाचे काम अत्यंत संथ चालु आहे, तसेच चालु असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, याबाबत जरुर त्या मानदंडानुसार काम चालु आहे याची कोणीही खात्री करत नाही, कामाची संथ गती, अनेक डायव्हर्जन इत्यादीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे, काही ठिकाणी सेवा रस्त्यांवरुन वाहतुक सुरु असल्याने, किरकोळ अपघातासह वादाचे प्रसंग वाहनधारकांना येत आहेत तर स्थानिकांना प्रचंड असुरक्षिततेमध्ये रस्ता ओलांडावा लागत आहे, पावसामुळे पडलेले खड्डे अनेक दिवस झाले तरी दुरुस्त केले जात नाहीत त्यामुळे या कामाचा ठेका असलेल्या मुळ कंपनीलाच आता हिसका दाखवा आणि कारवाई करावी अशी आग्रही मागणी खा.श्री.छ. उदयनराजे भंोसले यंानी केली.
पुढे बोलताना खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी सांगीतले की, खंबाटकी घाटा मध्ये दुहेरी बोगदा व्हावा म्हणून आम्ही आग्रही आहोत, याबाबत प्राथमिक सर्वेक्षण झाले आहे, या नवीन दुसर्या बोगदयाचे काम सुरु व्हावे, तसेच सध्या खंडाळयाकडे जाताना बोगद्यातुन बाहेर पडल्यावर 90 अंशाचे अतिशय धोकादायक असलेला एस आकाराचा वळण रस्ता, सरळ करण्यात यावा, पारगांव खंडाळा येथे अनेक अपघात होवून जिवीत हानी झाली आहे, वारंवार येथे अपघात होत असल्याने, याठिकाणी उड्डाणपूल उभारावा अशा सूचना केल्या. खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी सुचवलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही केली जाईल आणि सहापदरीकरणाचे कामकाजाबाबत रिलायंस कंपनीविराधात आजच कारवाई नोटीस बजवावी असे आदेश ना.नितिन गडकरी यांनी दिले, खा.श्री.छ.उदयनराजे भोसले हे खंबाटकी घाटातील दुसर्या बोगद्यासाठी तसेच धोकादायक एस वळण सरळ करणे इत्यादी बाबत नेहमी आग्रही राहीले आहेत,त्यांच्या मतनुसार कार्यवाही केली जाईल असेही ना.गडकरी यांनी बैठकीत स्पष्ट केले.