सातारा : नावात राम असल्यामुळे निश्चितच त्यांना महत्व आहे पण ज्यावेळेस संकोचित बुध्दिने वाणीचा ते वापर करतात, त्यावेळी ते रावणाची भुमिका घेत असतात हे त्यांनी समजून घ्यावे, असा पलटवार विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव घेवून आज खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केला.
शासकीय विश्रामगृह सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी जि.प. उपाध्यक्ष रवि साळुंखे, कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, जि.प. सदस्य संदीपभाऊ शिंदे, माजी शिक्षर सभापती सुनिल काटकर उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. श्री.छ. उदयनराजे भोसले म्हणाले, गेल्या दोन तीन दिवसापासून माझे जे कौतुक झाले, त्यामुळे मी न जेवताही मला ढेकर आला. या जिल्ह्याचे हितचिंतक मित्र, नेते आमदार यांनी कौतुक केले. त्याचे मनापासून आभार मानतो.
वास्तविक पहाता अॅक्शन, रिअॅक्शन या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या कदापिही विसरता कामा नये, समाजामुळे आपण आहोत ही भावनाही लक्षात घ्यायला हवी. कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावरील अविश्वास ठराव मोठ्या हिंमतीने त्यांनी मांडला, मग तो का बारगळा? याबाबत नेत्यांनी स्वत:ला प्रश्न विचारून तपासून पहावे. जे काय घडले ते गांधीजींच्या विचाराला चालना देणारी घटना घडली. कारण गांधीजींनी स्वत: आवर्जून उल्लेख केला होता. जोपर्यंत सत्तेचे विकेंद्रीकरण होत नाही. तोपर्यंत खर्या अर्थाने लोकशाही देशात नांदणार नाही. पक्षातील घाण निघून गेली असे वक्तव्य त्यांनी करत असताना स्वत:ला तपासून पहावे आज राष्ट्रवादी पक्षाची रामराजेमुळे उतरती कळा सुरू झाली आहे. गद्दारांना आता थारा नाही. असे त्यांनी बोलून अकलेचे तारे तोडले आहेत. तसेच त्यांनी विचार करून बोलायला हवे होते. राष्ट्रवादी पक्ष सत्तेवर असताना मोठ्या प्रमाणाव भ्रष्टाचार झाला आहे. थोरले पवारसाहेबांना भेटून त्यांच्या कानावर भ्रष्टाचाराबाबत माहिती देणार आहे. खरं तर गद्दारीच्या बाबतीत त्यांनी थोडासा इतिहास तपासला असता तर उचित ठरला असता. कोणी कुठे कुठे भ्रष्टाचार केला आहे त्याचा तपशील माझ्याकडे आहे. नैतिकदृष्ट्या तेवढी ताकद असेल तर ‘जनता की अदालत’ मध्ये मला बोलवावे. सहकारातही आम्ही हे केले ते केले असे सांगून डोंगारा पिटणार्यांनी देगाव येथील कार्यक्रमात जे वक्तव्य केले ते चूकीचे आहे, हिम्मत असेल तर समोरा समोर येवून बोलावे. क्रिकेट खेळण्यात ते माहिर आहेत, मात्र बॅटींग सुरू असताना मी आडवा पडलो म्हणणार्यांनी वीज वितरणचे मुख्य कार्यालय बारामतीला हलवले. हा जिल्हा यापुढे कोणाच्या सांगण्यावरून दावणीला बांधला जाणार नाही. आतापर्यंव तीन अंक झालेले आहेत. आता चौथा अंक पहाच असे सांगून खा. उदयनराजे भोसले म्हणाले, निलंबीत जि.प. सदस्यांना फंड देणार नसाल तर आमदारांनी विचार करायला हवा. सदस्यांना फंड न देण्याची भाषा कोणीही करू नये. फंड दिला जाईल हा माझा शब्द आहे.