सातारा: सातारकरांची विकासाच्या बाबतीत असणारी एकजूट, श्रमशक्ती ही वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या या विकासात्मक सहकार्यामुळेच जलयुक्त शिवार अभियानात सातारा जिल्ह्याची राज्यात यशस्वी वाटचाल आहे, असे उद्गार जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज काढले.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांच्या कार्यभाराला आज दोन वर्षे पूर्ण झाली. आपल्या या दोन वर्षातील कार्यभाराविषयी ते बोलत होते. मी आलो त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी पाणी या विषयावर जिल्ह्यामध्ये खूप चांगले काम केले आहे. तोच धागा पकडून मी नियोजन केले आणि खास करुन दुष्काळी भागावर लक्ष केंद्रीत केले. महाराष्ट्र शासनाने त्यानंतर जलयुक्त शिवार अभियान सुरु केले. या अभियानाच्या माध्यमातून लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गावांमध्ये जलसाठे निर्माण केले आहेत.
जिल्ह्यामध्ये महारास्व अभियान मोठ्या प्रमाणात राबविले. 750 किलो मिटर रस्ते अतिक्रमणातून मोकळे केले. समाधान योजनेमार्फत वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे दाखले सामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.
जिल्ह्यातील छोट्या छोट्या त्रुटींमुळे काही प्रकल्प रखडले होते ते मार्गी लावले. त्याचबरोबर काही ठिकाणी भूसंपादनाचे विषय होते ते पूर्ण केले. सहापदरीकरण रस्त्याच्याबाबतीत असणार्या अडचणी, सुरक्षिततेच्यादृष्टीकोनातून केली जाणारी उपाययोजना यावर विशेष लक्ष केंद्रीत केले. पुनर्वसनाचा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
शेतकर्यांच्या सातबार्यावर स्लॅबनुसार असणारे शिक्के उठविण्यात आले यामुळे मोठा दिलासा त्यांना मिळाला आहे. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून एकीकृत आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन विशेष योजना राबविण्यात येत आहेत.
सातारकरांचे मला सहकार्य मिळाले. त्यांच्या विकासात्मक सहकार्याच्या जोरावर सातारा जिल्ह्यामध्ये मी काम करु शकलो. आपण आपल्या दोन वर्षाच्या कारकीर्दीत पूर्णपणे समाधानी आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या