दस्तुरखुद्य राजानेच औत हातात धरुन, पेरणीचा केला शुभारंभ
सातारा : महाराष्ट्रात 86 टक्के शेती पावसावर व खरीप हंगामावर अवलंबून असते. पावसाळयाच्या तोंडावर बळीराज शेतीच्या मशागतीच्या आणि पेरणीपूर्व नांगरणीच्या कामात व्यस्त असतो, गेल्या दोन वर्षापासून, ऐन पावसाळयात पावसाने अवकृपा केल्याने, शेतक-यांच्या अडीअडचणी वाढतच जात आहेत, त्यामुळे यंदाच्या मौसमी पावसात तरी पावसाने बळीराजाला धीर द्यावा म्हणून दस्तुरखुद्य राजानेच औत हातात धरुन, पेरणीचा शुभारंभ अंबवडे खुर्द मानेवाडी येथे केल्याने, बळीराजाला हुरुप येण्याबरोबरच यंदा पाउस तुलनेने निश्चित चांगला पडेल असा विश्वास बळीराजामध्ये संचारला आहे.
सातारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजगादीचे थेट 13 वे वंशज आणि सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे नेहमीच कधी काय करतील याचा अंदाज भल्या भल्यांना आलेला नाही, अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतलेल्या उदयनराजेंना कोणत्याही क्षेत्राचे वावडे नाही, हे आज अनाहुतपणे घडलेल्या प्रसंगाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. उदयनराजे आज एका भुमिपूजन समारंभासाठी अंबवडे खुर्द मानेवाडी येथे आले होते, भुमीपूजन समारंभ येथोचित पार पाडल्यावर कार्यक्रमाचे ठिकाणाहुन परतत असताना एका शेताजवळ पेरणीसाठी औत धरण्याची तयारी सुरु होती, हे पहाताच खासदारांनी त्यांची गाडी थांबवण्याचा इशारा केला त्याबरोबर त्यांच्या गाडीसह इतर गाडयांचा ताफाही थांबला, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे थेट गाडीतुन उतरुन पायवाटेने पाभार (कूरी) धरण्याची तयारी सुरु असलेल्या शेतात गेले. तेथील औताची तयारी कशी चालु आहे याचे त्यांनी काही वेळ निरिक्षण केले, त्यानंतर त्यांनी स्वतः औत घेवून बैलांना जोडून पेरणीच्या कामास स्वतः हातात धान्याची मूठ धरुन, सुरुवात केली.
या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या पेरणीच्या पवित्राने सर्वच जण अचंबित झाले, महाराज साहेबांना औत कसे धरायचे, हाकारा कसा करायचा याची असलेली परिपूर्ण माहीती बघुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, तथापि प्रत्यक्ष शिवाजी महाराज यांच्या थेट वंशजानेच औताचा कासरा हातात धरुन, मूठ धरुन, पेरणीची सुरुवात केल्याचे पाहुन परळी खोर्यांतील प्रत्येक जेष्ठ ग्रामस्थाने आता काहीच काळजी नाही, यंदा राजानेच पाभार/कुरी धरल्याने, पावसाळा निश्चित चांगला जाईल असा विश्वास व्यक्त केला.जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष रवि साळुंखे, माजी सभापती सुनील काटकर, माजी जिल्हापरिषद सदस्य भिकू भाउ भोसले, माजी पंचायत समिती सदस्य संजय भंडारे, भुमाताचे जिल्हाध्यक्ष धर्मराज जगदाळे, अशोक सावंत, अनिल निकम आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.