अजिंक्यतारा कारखान्याकडून नोव्हेंबरमधील गाळपाचे पेमेंट बँक खात्यात जमा : आ. शिवेंद्रसिंहराजे; दर दहा दिवसात गाळप होणार्‍या ऊसाचेे बील अदा

साताराःअजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात (2017-18) गाळपास येणार्‍या ऊसाला 3 हजार रुपये प्रती मे. टन उचल जाहिर केली होती. जाहिर केल्याप्रमाणेच कारखान्याने नोहेंबर महिन्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाला प्रती मे. टन 3 हजार रुपयाप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग केली असून दर दहा दिवसात गाळप होणार्‍या ऊसाचे बील लगेचच शेतकर्‍यांना अदा केले जात असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार  शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.
कारखान्याकडे दि. 1 ते 10 नोहेंबर 2017 या दहा दिवसांत गाळपास आलेल्या ऊसाला प्रती मे. टन 3 हजार रुपये याप्रमाणे होणारी रक्कम दि. 15 नोहेंबर रोजी संबंधीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दि. 11 ते 20 नोहेंबर या दहा दिवसांत गाळप झालेल्या ऊसाचेही पेमेंट दि. 28 नोहेंबर रोजी संबंधीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. तसेच दि. 21 ते दि. 30 नोहेंबर या दहा दिवसांत गाळप झालेल्या 37 हजार 704 मे. टन ऊसाचे प्रती टन 3 हजार रुपये याप्रमाणे 11 कोटी 31 लाख 12 हजार 123 रुपये एवढी रक्कम दि. 13 डिसेंबर रोजी संबंधीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. कारखान्याची एफआरपी 2640 रुपये प्रती मे. टन असून 360 रुपये वाढीव हप्ता असे मिळून एकत्रीत 3 हजार रुपये प्रती मे.टन याप्रमाणे पेमेंट जाहिर केलेल्या धोरणाप्रमाणे नाहेंबर महिन्यात गाळप झालेल्या सर्व ऊसाचे पेमेंट वेळेत अदा केले आहे. संबंधीत शेतकर्‍यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत जावून बिल जमा झाल्याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
कारखान्याचे दैनंदिन गाळप 4200 मे. टनाने पुर्ण कार्यक्षमतेने सुरु असून या हंगामात हंगाम चालू झाल्यापासून ते आज अखेर 1 लाख 50 हजार 390 मे. टन ऊसाचे गाळप होवून 10.76 टक्के साखर उतार्‍याने 1 लाख 57 हजार 540 क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. ज्या सभासद, बिगर सभासद शेतकर्‍यांच्या ऊसाच्या पुरवणी नोंदी करावयाच्या राहिल्या असतील तर, त्यांनी कारखान्याच्या संबंधीत गट ऑफिसमध्ये जावून आपल्या ऊसाची पुरवणी नोंद करुन घ्यावी. कारखान्याकडे नोंद केलेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप केले जाणार आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.