(अजित जगताप)
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी मध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस दलाला पार पाडावी लागते. त्यामुळे महाराष्ट्रात सातारा पोलिसांचा दबदबा सर्वश्रुत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. आता विधानसभेच्या तोंडावर झालेली सातारा पोलीस अधीक्षक बदली स्थगित करण्यात आली. याची आता पोलीस दलातील वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे.
महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट अशा तीन गटाची महायुती सत्तेमध्ये आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीआधीच राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या . सरकारकडून भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील ४४ तर १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर सुद्धा काही बदल्या झाल्या पण सातारा पोलीस अधीक्षक वगळता सर्वजण आपापल्या बदलीच्या ठिकाणी रुजू झाले.
सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची मंगळवारी मुंबई शहर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली होती .सातार्यात नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. पावणे दोन वर्षे त्यांनी सेवा झाली . त्यांच्या कार्यकाळात प्रतापगड उत्सव समिती पूजा पाठ व अतिक्रमण हटवणे, बेरोजगारांसाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उंच भरारी तसेच चोरीतील सुमारे ४ किलो सोने जप्त करुन मूळ तक्रारदार यांना परत दागिने देण्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. अजूनही काहींचा चोरीला गेलेला मुद्देमाल सापडलेला नाही. तो मुद्देमाल सुद्धा कधीतरी सापडेल. अशा आशेवर तक्रारदार आहेत. अशी कामगिरी करून सुद्धा समीर शेख यांची अचानक बदली झाल्यामुळे यामध्ये नक्कीच राजकारण झाले असे बोलले जाऊ लागले. पोलीस खात्यामध्ये विचारपूर्वक निर्णय घेऊन बदल्या सत्र केले जातात.
पोलीस दलामध्ये आय.पी.एस. व प्रमोटेड आय.पी.एस. असे दोन भाग आहेत . त्यामुळे सातारा पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक पद हे थेट आय.पी.एस. अधिकाऱ्यांकडे असावे अशी शांतता प्रिय नागरिकांची इच्छा असते . पण, त्यांच्या बदलीचे आदेश आल्यामुळे आणि ते तीन तासात रद्द झाल्यामुळे अनेकांना आपण सिनेमात तीन तासाचा पिक्चर बघतोय की काय? असा अनुभव घ्यावा लागला. ज्यांच्या बदल्या झाल्या त्यांना तातडीने त्या जागी हजर होण्याचे आदेश आले. पण, सातारच्या पोलीस अधीक्षक पदावर असलेले समीर शेख यांच्याबाबत त्यांना किमान विधानसभेच्या निवडणुकी पुरते तरी सातारमध्ये थांबण्याचे संकेत मिळालेले आहेत.दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांची समादेशक राज्य राखीव पोलिस बल, पुणे येथे बदली झाली. त्यांनी त्या ठिकाणी जाणे पसंत केले आहे. वास्तविक पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निगराणीखाली ही बदलीचे आदेश निघाले असले तरी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना मात्र या बदली प्रक्रियेतून माहिती घेतल्यानंतर समाधान झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच तर गड राखायचा असेल तर काही गनिमी कावा करावा लागतो. अशा पद्धतीने तीन तासातच बदलीला स्थगिती दिल्यामुळे राज्य सरकार निर्णय घ्यायला घाई करते तेवढ्यात कालावधीमध्ये निर्णय सुद्धा बदलतात ?यालाच पारदर्शकता म्हणतात का ?असा आता विरोधक बोलू लागले आहेत. शेवटी विरोधकांचं काम आहे सत्ताधाऱ्यांवर टीका करणे.
कोणत्याही क्षेत्रांमध्ये सर्वांनाच जीवाची मुंबई करण्याची हौस असते. त्यामुळे ते मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करतात. पण काही वेळेला घरच्या जबाबदारीमुळे त्यांना गाव सोडता येत नाही. गावच्या वातावरणात जीव अडकलेला असतो. असे ग्रामीण भागात बोलले जाते. तो संदर्भ या ठिकाणी लागू होत नाही हे तुल नमूद करावे वाटते
. सद्यस्थितीत बदली स्थगित केल्यामुळे सध्या सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे चांगलेच वजन वाढलेले आहे. काही हिंदुत्ववादी संघटनेने तर आनंद उत्सव साजरा केला. तर दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्याचे खासदारांच्या मर्जीतले असलेल्या त्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली न झाल्यामुळे ज्यांनी आनंद उत्सव साजरा केला त्यांना पुन्हा एकदा फटाके वाया गेल्याचे दुःख झाले असावे. असे दिसून येत आहे.
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये सातारचा कार्यभार स्वीकारला तेव्हा त्याला अनेकांनी पुस्तक भेट दिली. त्यामुळे त्यांचे सातारच्या इतिहासाबाबत वाचनही चांगली झाली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सराईत टोळ्यांवर, कामगारांवर जरब बसवण्याचा प्रयत्न केला. पण, काही स्थानिक मुकादम सुटले आहेत. त्यांचा फारसा त्रास झाला नाही. ज्यांचा त्रास वाढला त्यांना मोक्कांतर्गत, तडीपारी तसेच एमपीडीएच्या प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाई केल्या. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ले स्वच्छता मोहिम, उंच भरारी, जनता दरबार, बेरोजगारांसाठी उंच भरारी अशा प्रभावी योजना राबवल्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पत्रकारांची चारित्र्य पडताळणी केली. त्यामुळे पोलीस दलाच्या काही नियमित पत्रकार परिषदेला अर्धा तास अगोदरच उपस्थित राहून बातम्या लिहितात दाखवतात ते काही पत्रकार नाराज झाले होते. पण त्यांनी ती नाराजी दाखवली नाही. कारण चारित्र्य पडताळणी हा कळीचा मुद्दा झाला होता. मात्र, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले अशा लोकप्रतिनिधींना सलाम करणे काही जण विसरले नाहीत हे सुद्धा दिसून आलेले आहे. एकूण या बदली व स्थगिती बद्दल आता कधीतरी माहिती बाहेर पडेल. तोपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.
————-++++————-