सातार्‍यात एसटी बस स्वच्छतेने प्रवाशांना मिळाला दिलासा

सातारा: गेली चार महिने कोरोना संसर्गामुळे एसटी वाहतुक थांबविण्यात आली होती. त्यानंतर अत्यावश्यक सेवा व तालुका पातळीवर एसटी फेर्‍या सुरू करण्यात आल्या. परंतु या एसटीचे बाकडे गंजून गेल्याने प्रवाशांना दोन वेळा सॅनिटायझरचा वापर करावा लागत होता. तर काहींच्या कपड्यांना गंजलेल्याचे डाग लागत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु सध्या अशा एसटीबस स्वच्छ करून प्रवाशांच्या सेवेसाठी पाठविण्यात येवू लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सातारा जिल्हांतर्गत 67 तर आंतरजिल्हा 76 अशा पध्दतीने 143 बससेवा सातारा जिल्हयातील विविध आगारातून सुरू करण्यात आलेल्या आहेत. विशेषत: पुणे, मुंबई या ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांसाठी सकाळी 6 पासून प्रत्येकी दोन तासांना सातारा – मुंबई, सातारा- ठाणे, बोरिवली अशा एसटी बसेस धावू लागलेल्या आहेत. तशाच पध्दतीने सातारा – स्वारगेट या मार्गावर प्रत्येकी एका तासाला एसटी बस फेर्‍या सुरू करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती सातारा विभागाचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली आहे.
लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्व एसटी वाहतुक बंद करण्यात आल्यामुळे एसटी महामंडळाचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. विशेषत: ग्रामीण भागात एसटी हेच प्रवासाचे माध्यम आहे. हे माध्यम काही काळासाठी बंद झाल्यामुळे तसेच अनेक गावात प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाल्यामुळे एसटी त्या गावापर्यंत पोहचू शकली नाही. परंतु कोरोना संकटावर मात करण्यासाठी पोलीस, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन त्याचबरोबर एसटी महामंडळाने खूप मोठे योगदान दिले आहे. अनेक वाहक-चालकांनी तसेच इतर अधिकार्‍यांनी आपला जीव धोक्यात घालून सेवा देण्यासाठी अहोरात्र परिश्रम केलेले आहेत. एसटी महामंडळ हे खर्‍या अर्थाने प्रवाशांच्या सेवेसाठी आहे. अनेकांना एसटीने सवलतीच्या दरात प्रवास करण्याची मुभा दिलेली आहे. परंतु सध्या विशेष काळजी म्हणून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना प्रवास करता येणार नाही. अशी चर्चा सुरू आहे. लवकरच एसटी पूर्ण क्षमतेने पूर्ववत सेवा देईल त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्या-येण्यासाठी मदत होईल, असे मत एसटी प्रवासी रविंद्र जगताप, ज्येष्ठ नागरिक बा.ग.धनावडे तसेच शासकीय कर्मचारी यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, प्रवाशांना एसटीच्या सेवेबाबत माहिती देण्यासाठी सातारा येेथील वाहतुक अधिकारी मोहन महाडिक तसेच सातारा आगारातील डी.डी. शिंदे हे सकाळी 6 वाजल्यापासून सातारा बसस्थानकात कर्तव्य बजावत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांचे प्रवाशांनी कौतुक केले आहे.