पाटण तालुक्यात आजपर्यंत सहा जणांना कोरोना लागण ; चार जणांच्यावर कृष्णा हाॅस्पीटल कराड येथे उपचार सुरू ; एक कोरोना मुक्त तर एका महिलेचा मृत्यू.

पाटण :- पाटण तालुक्यात आत्तापर्यंत सहा जणांना कोरोनाची लागन झाली असून त्यापैकी
शिरळ – १, म्हावशी – १, धामणी (कुंभारगाव) – १, चाळकेवाडी (कुंभारगाव) – १ अशा चार कोरोना बाधीत रुग्णांवर कृष्णा हाॅस्पीटल कराड येथे उपचार सुरू आहेत. डेरवण येथील बालक कोरोनामुक्त झाले असून बनपुरी येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर शिरळ येथील रुग्णाच्या निकटवर्तीय सहवासातील एका युवकाला त्रास जाणवू लागल्याने त्याल उपचारासाठी कृष्णा हाॅस्पीटल येथे गुरुवारी दाखल करण्यात आले आहे. मात्र त्याचा कोरोना अहवाल प्रतिक्षेत आहे. सध्या पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात एकूण ६७ व तळमावले कोरोना केअर सेंटरमध्ये ९ अशा एकूण ७६ व्यक्ती दाखल असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आर. बी.  पाटील यांनी दिली.

पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील डेरवन येथील एका दहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागन झाली होती. त्याच्यावरील उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर खंडीत झालेल्या कोरोनाने गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा डोके वर काढले आहे. यात पहिल्यांदा ढेबेवाडी विभागातील बनपुरी येथील एका वृद्ध महिलेचा मरणोत्तर चाचणीनंतर कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. त्यानंतर कोयना विभागातील शिरळ येथील एका सत्तर वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागन झाली. गुरूवारी पुन्हा तालुक्यातील तिघांना कोरोनाची लागन झाल्याची माहिती मिळाली. यामध्ये पाटण शहरानजीकच्या म्हावशी येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागन झाली आहे. काही दिवसांपुर्वीच हा कर्मचारी मुबंई येथून गावी आला होता. चाळकेवाडी (कुंभारगाव) येथील एका प्राथमिक शाळेत क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागन झाली तर रात्री उशीरा धामणी (कुंभारगाव) येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागन झाल्याची माहिती मिळाली. सध्या संबंधित कोरोना बाधीत रूग्नांवर कृष्णा हाॅस्पीटल कराड येथे उपचार सुरू आहेत.

यापुर्वी पाटण कोरोना केअर सेंटरमध्ये ४६ व्यक्ती विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्या होत्या. यापैकी ३८ व्यक्तींचे स्वॅप नमुने गुरूवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर यापुर्वी तळमावले येथील नऊ व भारसाखळे येथील संशयीत मृत व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरूवारी म्हावशी येथील १२ व चाळकेवाडी येथील ९ अशा हाय रिस्कमधील २१ व्यक्तींना पाटण येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याने येथील संख्या आता ६७ झाली आहे. याशिवाय धामणी येथील ९ हाय रिस्कमधील व्यक्तींना तळमावले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या पाटण येथील शंभर बेड व तळमावले येथील १५० बेडचे कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण ७६ व्यक्तींना दाखल करण्यात आले आहे. यापैकी उर्वरित व्यक्तींचे स्वॅप नमुने घेऊन तेही तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. म्हावशी, चाळकेवाडी, धामणी ही गावे सिल करण्यात आल्याचीमाहिती श्रीरंग तांबे यांनी दिली.

दरम्यान शिरळ येथील संबंधित कोरोना बाधीत रूग्ण हा प्राथमिक आरोग्य केंद्र हेळवाक  ( कोयनानगर ), पाटण येथील खाजगी व ग्रामीण रूग्नालयात गेला होता. खबरदारी म्हणून या ठिकाणचे डाॅक्टर्स व कर्मचारी यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. संबंधित व अन्य कोरोना बाधीत रूग्नांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीय, नातेवाईक यांचे स्वॅप नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तथापी जर गरज वाटली तरच या डाॅक्टर्स व कर्मचारयांचे स्वॅप नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान जोपर्यंत यातील सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत क्वारंटाइन होण्याची वेळ व अहवालाबाबतची टांगती तलवार या सर्वांच्यावर रहाणार आहे. यामुळे त्यांच्या वैद्यकीय सेवा, व्यवसाय व इतर सर्वच बाबींवर मर्यादा आल्या आहेत.