सज्जनगडावर दहशत माजवत  समाधी मंदिरासमोरील पितळ आणि पंचधातुच्या कासवाची तोडफोड, मनवे याला अटक

सातारा : सज्जनगडावर दहशत माजवत समर्थ रामदास स्वामींच्या समाधी मंदिरासमोरील पितळ आणि पंचधातुच्या कासवाची तोडफोड गुरुवारी करण्यात आली होती. या कासवाचे दोन पाय चोरून नेहणार्‍या लक्ष्मण कुमार मनवे (वय, 35 रा. सज्जनगड) याला गुरुवारी रात्री उशीरा सातारा तालुका पोलिसांनी अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सज्जनगड येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधी मंदिर परिसरात बुधवारी रात्री लक्ष्मण मनवे याने खूप काळ दहशत माजवित मंदिरासमोर असणार्‍या पितळ आणि पंचधातुच्या कासवाची तोडफोड करून त्याचे मागील दोन पाय चोरून नेले होते. त्यानंतर त्याने त्याचा मोर्चा समाधी मंदिर पाठीमागे असणार्‍या धाब्याचा मारुती मंदिर रस्त्याकडे वळवला आणि या मार्गावरील ट्यूब लाईटचीही तोडफोड केली. हा यावरच समाधानी न राहता त्याने परिसरात असणार्‍या गटारांचीही तोडफोड केली. गुरुवारी पहाटे मंदिरात येणार्‍या समर्थभक्त आणि ग्रामस्थ यांच्या निदर्शनास ही घटना आली.
बुधवारी रात्री उशीरा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक चेतन मचले आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सज्जनगड येथे धाव घेत या प्रकरणाची माहिती घेत आरोपी लक्ष्मण मनवे याला अटक केली आहे. त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार सावंत करीत आहेत.