हॉटेल व्यवसायिकांच्या विरोधात गजानन नगरमधील रहिवासी करणार तीव्र आंदोलन

वाई : वाईतील यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत व बावधन नाक्याजवळ गजानननगर हॉसिंग सोसायटी असून या सोसायटीच्या बाजूने ओढा गेला आहे, या ओढ्यात मुख्य रस्त्याच्या बाजूला असणार्‍या हॉटेल मधून दररोज निघणारे शिळे अन्न टाकीत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, गजानननगर मधील रहिवाशांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्याच्या निषेधार्थ गजानननगर मधील नागरिकांनी यशवंतनगर ग्रामपंचायतीला निवेदन देवून हॉटेल व्यवसायीकांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या परिसरातील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, वाई शहराचे उपनगर म्हणून यशवंतनगर ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते, या ग्रामपंचायतीच्या हद्दीत अनेक सोसायटीचे जाळे असून उच्चभ्रू लोकांचे वास्तव या परिसरात आहे, वाई-पुणे मुख्य रस्त्यावर अनेक हॉटेल व्यवसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. या मुख्य रस्त्याच्या बाजूलाच बावधन नाक्यावर गजानननगर हॉसिंग सोसायटी असून बाजूने सोनजाईनगर मधून येणारा मोठा ओढा गेला आहे, रस्त्याच्या बाजूला असणारे सर्व हॉटेल व्यवसायिक दररोज या ओढ्यात आपल्या हॉटेल मधून निघणारे शिळे अन्न व इतरही वेष्ट मटेरीअल या ठिकाणी टाकत आहेत. खराब अन्न टाकल्याने त्या परिसरात प्रचंड दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्याचा त्रास शेजारीच असणार्‍या गजानन नगर मधील नागरिकांना सहन करावा लागत आहे, त्यांना या ठिकाणी राहणे मुश्कील झाले आहे, संपूर्ण देशात शासन स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत लाखो रुपये खर्च करीत असून मुख्य रस्त्याच्या बाजूलाच अशा पद्धतीचे घाणीचे साम्राज्य असेल तर वाई शहरात येणार्‍या पर्यटकांचे स्वागत कसे करणार हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे या हॉटेल व्यवसायिकांच्या विरोधात सर्व गजानननगर मधील रहिवाशी उभे ठाकले असून आंदोलनाच्या तयारीत आहेत.या नगरमधील रहिवाश्यांनी अनेक वेळा वाई नगरपालिका, यशवंतनगर ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या आरोग्य विभागाला लेखी निवेदन दिले आहे, तरीही कोणतीही कारवाई न झाल्याने रास्ता रोको करण्यात येवून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर यशवंत लेले, दीपक गायकवाड, दिलीप तांबे, लक्ष्मण जगताप, शशिकांत गाढवे, प्रा.दिनकर पाखरे, यांच्या सह शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.