एहसास मतिमंद बालगृहाला २ महिने पुरेल एवढे अन्नधान्य दिले भेट  ; कोरोनाच्या गंभीर संकटात श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे यांची मोलाची मदत 

सातारा  :- कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग महाभयंकर संकटात सापडले आहे. लॉक डाऊनमुळे अनेक गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थतीत देणग्यांवर अवलंबून असणाऱ्या विविध संस्थाही अडचणीत सापडल्या आहेत. वळसे ता. सातारा येथील एहसास मतिमंद बालगृह या संस्थेवरही गंभीर परिस्थिती ओढवली असून अन्नधान्य नसल्याने येथील मुलांवर उपासमारीची वेळ आली होती. दरम्यान, कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी या संस्थेला वेळीच मदत केल्याने या गंभीर परिस्थितीतून हे बालगृह सावरले आहे.
कोरोना साथीला आळा बसावा यासाठी देशभरात लॉक डाऊन सुरु आहे. लॉक डाऊनमुळे किराणा माल, दूध, भाजीपाला आणि मेडिकल वगळता सर्वप्रकारची दुकाने बंद आहेत. अन्य दुकाने आणि बहुतांशी बाजरपेठ बंद असल्याने बेरोजगारी आणि उपासमारीची समस्या वाढली आहे. अनाथालये, वृद्धाश्रम, बालगृहे आदी सामाजिक संस्थाही अडचणीत सापडल्या आहेत. वळसे ता. सातारा येथे एहसास मतिमंद मुलांचे बालगृह हि संस्था असून या संस्थेत मतिमंद मुलांच्या निवास आणि शिक्षणाची सोय आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे हे बालगृह अडचणीत सापडले होते. याची माहिती सौ. वेदांतिकाराजे भोसले यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ बालगृहाच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली. व्यवस्थापकांच्या मागणीनुसार किमान  दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य सौ. वेदांतिकाराजे यांनी बालगृहाला तात्काळ भेट दिले यामुळे या बालगृहावरील मोठे संकट टळले आहे.
या बालगृहाला सौ. वेदांतिकाराजे यांच्या माध्यमातून सातत्याने मदत केली जाते. यावेळी भयावह संकटाच्या प्रसंगी सौ. वेदांतिकाराजे यांनी मोलाची मदत केल्याने बालगृहाचा पुढील दोन महिने अन्नधान्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालगृह व्यवस्थापनाने मुलांची आणि कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी. बालगृहासाठी कोणत्याही प्रकारची मदती करण्यासाठी आपण नेहमीच तत्पर आहोत, अशी ग्वाही सौ. वेदांतिकाराजे यांनी याप्रसंगी व्यवस्थापनाला दिली आहे.