Friday, July 11, 2025
Homeठळक घडामोडीतुम्ही कितीही करा गट्टी : आता नाही सुट्टी

तुम्ही कितीही करा गट्टी : आता नाही सुट्टी

वडूज : कलेढोण (ता. खटाव) येथे नुकताच समाजभूषण हणमंतराव साळुंखे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मृतिग्रंथ प्रकाशन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी सर्वपक्षीय विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. भाषणात बोलताना त्यांनी विरोधकांना तुम्ही कितीही गट्टी केली तरी भविष्यात कोणालाच सुट्टी देणार नाही. असा इशारा देत व्यासपीठावरच जाहीर दंड थोपाटले.
वर्षाची मैत्री जपण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील मान्यवरांनी निमंत्रण दिले होते. आ. गोरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बाहेरच्या जिल्ह्यातून माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे व आटपाडीचे युवा नेते गोपीचंद पडळकर हे दोघे उपस्थित होते. तर खटाव तालुक्यातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमात सुरुवातीला बोलतानाच जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, अतितचे समृध्दी जाधव व अन्य वक्त्यांनी हणमंतराव तात्यांनी अल्पसंख्यांक समाजात जन्म घेवूनसुध्दा नाभिक समाजासह कलेढोण परिसराच्या उध्दारासाठी केलेल्या कामाची मुक्त कंठाने प्रशंसा केली होती. आ. गोरे यांचे भाषण सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई, निमसोडचे युवा नेते नंदकुमार मोरे यांनी व्यासपीठावरुन काढता पाय घेतला होता. तर याचवेळी आ. गोरे यांच्यापासून विधानसभा निवडणूकीपासून बाजूला गेलेले बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, संजय गांधी निराधार योजेनेचे अध्यक्ष विजयकुमार शिंदे यांचे एकत्रित आगमन झाले.
या घटनाक्रमामुळे आ. गोरे यांच्या भाषणात चांगलाच जोर चढला. त्यांनी अगोदरच्या वक्त्यांनी केलेला अल्पसंख्यांकांचा धागा पकडत भाषणास सुरुवात केली. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणूकीला काहींनी जातीय रंग दिल्याचा जाहीर आरोप केला. तर सुशिलकुमार शिंदे यांच्याबाबत आपणास नितांत आदर आहे. पक्षीय विचारधारेपेक्षा आपल्या दृष्टीने खटाव माणचा दुष्काळ संपविणे हेच एकमेव उद्दिष्ट असल्या कारणाने पक्षांतर केल्याचे समर्थनही केले. हे सांगत असताना सर्व विरोधक एकत्र आले होते. त्यांनी झुंड शाहिने आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला. एका रेशनिंग दुकानदाराचा मुलगा तीनवेळा आमदार झाला. हे प्रस्थापितांना सोसत नाही. मात्र त्यांनी काहीही केले तरी आपण सहजासहजी हटणार नाही. यापुढच्या काळात विरोधकांनी कितीही एकीची गट्टी करावी. आपण सुट्टी देणार नाही असे खुले आवाहन करत व्यासपीठावरच दंड थोपटले. आ. गोरे यांच्या भाषणानंतर सुशिलकुमार शिंदे यांनी विचार मांडले. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला आ. गोरे यांच्या तडफदार भाषणाचे कौतुक केले. ते म्हणाले, आ. गोरे छान बोलले. त्यांच्या सारखीच आपली मुलगी आ. प्रणिती शिंदेही सभागृहात अभ्यासूपणे बोलते. आ. प्रणिती या आपणापेक्षा हुशार झाल्या आहेत. मात्र त्यांनी कधीही विचारधारा बदलली नाही असा टोला आ. गोरे यांना अप्रत्यक्षपणे हाणला. तर अलिकडच्या काळात काही लोक फार चंचल झाले आहेत. असे मिश्कील भाष्य गोपीचंद पडळकर यांच्याकडे पाहात केले.
दंड आणि कॉलर
आ. गोरे यांनी डॉ. गुरव यांच्याकडे नजर कटाक्ष टाकत दंड थोपटले होते. तर त्यावेळी शेजारी पदाधिकार्‍यांनी मान खाली घातली. मात्र बेरकी डॉ. गुरव यांनी आ. गोरे यांना नजर भिडवत ङ्ग राजे स्टाईलने म कॉलर उडवत बचेंगे तो और भी लढेंगे असा अप्रत्यक्षपणे इशारा दिला. हे पाहात असणार्‍या व्यासपीठावरील एका संयोजकांनी डॉ. गुरव यांना जरा सबुरीने घ्या असे म्हणत साक्षात दंडवत घातले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular