मुंबई उपनगरच्या महिलांनी पुण्याची अकरा वर्षांची विजयी परंपरा खंडित करीत पार्वतीबाई सांडव चषकावर नांव कोरले ; पुण्याच्या पुरुषांनी मात्र श्रीकृष्ण करंडक  सलग दुसर्‍या वर्षी आपल्याकडे राखण्यात यश मिळविले

कराड ः  महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व सातारा जिल्हा कबड्डी असो. च्या मान्यतेने लिबर्टी मजदूर संघाने 66व्या पुरुष व महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झालेले उपांत्य फेरीचा पुरुषांचा एक व दोन अंतिम सामने आज खेळविण्यात आले. महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगरने पुण्याची अकरा वर्षांची विजयी परंपरा खंडित करीत 30-23 असा विजय मिळवीत  पार्वतीबाई सांडव चषक आपल्या नावे केला.

या विजयासाठी त्यांना फार प्रतीक्षा करावी लागली. या अकरा वर्षातील सहा वेळा त्यांनी अंतिम फेरीत धडक दिली होती. पण प्रत्येक वेळी त्यांना अपयशाला सामोरी जावे लागले. यंदा मात्र उपनगरला यश आले. सुरुवाती पासून सावध खेळ करीत मध्यांतराला 12-11अशी आघाडी घेतली. मध्यांतरानंतर आपल्या आक्रमकतेची धार वाढवित पहिल्या पाच मिनिटात पुण्यावर पहिला लोन देत 17-14अशी आघाडी घेतली. शेवटच्या पाच मिनिटात आणखी एक लोण देत ती 28-20 अशी भक्कम केली. शेवटची तीन मिनिटे सावध खेळ करीत उपनगरने पुण्याला चढाईत एक-एक गुण देत आपला विजय निश्चित केला. उपनगरच्या कोमल देवकरने आपल्या 17 चढायात 7गुण मिळविले, तर एक पकड यशस्वी केली. सायली नागवेकरने 10 चढायात 1 बोनस व 5 गुण असे एकूण 6गुण प्राप्त केले. सायली जाधवने 3 यशस्वी पकडी केल्या. अभिलाषाने 11 चढाया केल्या व 2बोनस आणि 1 गुण मिळविला. पुण्याकडून आम्रपाली गलांडे हिने 8चढायात 1 बोनससह 5गुण मिळविले. पूजा शेलारचा देखील प्रभाव पडला नाही. तिने देखील 8चढायात एक बोनससह 5गुण मिळविले. पुण्याने 2006साली चिपळूण- रत्नागिरी येथे झालेल्या निवड स्पर्धेत मुं. उपनगरचाच पराभव करून या विजयाची मुहूर्तमेंढ रोवली होती.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात पुण्याने कोल्हापूरचा कडवा प्रतिकार 5-5 चढायांच्या जादा डावात 30-29(6-5)असा पराभव करीत  श्रीकृष्ण करंडक पुन्हा एकदा आपल्याकडे खेचून आणला. सुरुवाती पासून गुण घेत गतविजेत्या पुण्याने सामन्यावर आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला, पण कोल्हापुरने जोरदार प्रतिउत्तर देत आपल्याकडे आघाडी खेचून आणली. मध्यांतराला 13-11 अशी आघाडी कोल्हापूरकडे होती. शेवटच्या तीन मिनिटापर्यंत ही आघाडी 24-18 अशी टिकविण्यात त्यांना यश आले. पण पुण्याच्या मोमीन शेखच्या चढाईत कोल्हापूरचे 4 गडी शिल्लक असताना राजू कोरवेला मारून राखीव क्षेत्रात गेला. शेखचे अपील पंचांनी उचलून धरले. या नंतर कोल्हापूर वर लोण देत पुण्याने 24-24अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. सामना बरोबरीत संपल्यामुळे 5-5चढायांचा जादा डाव खेळविण्यात आला.
सामना जादा डावातही चुरशीने खेळला गेला. कोल्हापूरची शेवटची चढाई शिल्लक असताना 5-5अशी बरोबरी होती. कोल्हापूरच्या विनायक सुतकेने ही चढाई केली. पुण्याच्या खेळाडूंनी त्याची पकड करीत पुण्याला सलग दुसरे विजेतेपद मिळवुन दिले. पुण्याच्या सिद्धार्थ देसाईने 14 चढायात 7 गुण घेतले.एक पकड देखील त्याने पकड यशस्वी केली. विराज लांडगेने 4 पकडी यशस्वी केल्या. अक्षय जाधवने 2पकड  यशस्वी केल्या त्याच बरोबर एक बोनस व एक गुण देखील घेतला. कोल्हापूर कडून तुषार पाटीलने 18 चढायात 2बोनस व 7 गुण असे 9 गुण मिळविले. त्यांने एक अव्वल पकड देखील यशस्वी केली. विनायक सुतकेने 3 यशस्वी पकडी केल्या. निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या इतिहासात त्यांना एकदाच विजेतेपद मिळविण्यात यश प्राप्त झाले होते.  शिरोळ-कोल्हापूर येथे 2003साली झालेल्या स्पर्धेत त्यांनी विजेतेपद मिळविले होते.
या अगोदर झालेल्या पुरुषांच्या उपांत्य सामन्यात कोल्हापुरने सांगलीचा चुरशीचा लढा 5-5चढायांच्या जादा डावात 36-33(8-5)असा परतवीत अंतिम फेरीत धडक दिली होती. या स्पर्धेचे बक्षिस वितरण राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार पी.एन.पाटील,(सडोलीकर), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, नगाराध्यक्षा रोहिणी शिंदे, राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.