कोरेगाव पोलिसांकडून गुन्हेगारी कारवाया करणार्‍यांवर कारवाई

संघटीत टोळी तयार करुन गुन्हेगारी कृत्ये करणार्‍या
पप्पू उर्फ मंगेश युवराज जगताप याच्या मुसक्या आवळल्या
कोरेगाव : कोरेगाव पोलिसांनी यादीवरील गुन्हेगारांवर कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली असून, शहरात स्वत:ची टोळी तयार करुन गुन्हेगारी कारवाया करणार्‍या पप्पू उर्फ मंगेश युवराज जगताप वय 32, रा. पंचायत समिती कार्यालयाशेजारी, कोरेगाव याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्याच्याकडून विविध प्रकारे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याच्या विरोधात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक सुहास गरुड व पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश राठोड व संतोष मिसळे यांनी कोरेगाव शहर व तालुक्यात गुन्हेगारी कारवाया करणार्‍यांचा बिमोड करण्याचा निर्धार केला आहे. विशेषत: यादीवरील गुन्हेगारांवर कारवाईचा फास आवळून कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याचे काम देखील करण्यात येत आहे.
पप्पू उर्फ मंगेश युवराज जगताप याने कोणताही कामधंदा न करता, स्वत:ची गुन्हेगारी टोळी तयार केली. या टोळीमध्ये त्याने विनोद उत्तम शेडगे, रा. गोगावलेवाडी, ता. कोरेगाव, निलेश प्रभाकर इंगळे, रा. सज्जनपुरा-कोरेगाव व जमीर रमजान नदाफ, रा. जुनीपेठ -कोरेगाव यांचा समावेश करुन त्याने गुन्हेगारी कृत्ये करण्यास सुरुवात केली आहे. दिवसभर टोळीबरोबर भटकंती करुन टेहाळणी करायची आणि त्यानंतर गुन्हे करायचे, असे टोळीचे काम होते.
कोरेगाव पोलीस ठाण्यात दि. 7 मे 2018 व 13 ऑक्टोबर 2018 रोजी चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. या चोर्‍या या टोळीनेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पप्पू उर्फ मंगेश युवराज जगताप यानेच टोळी तयार केली असून, त्याच्या सूचनेप्रमाणेच गुन्हे केले जात असल्याची कबुली त्याच्या इतर साथीदारांनी दिलेली आहे. जगताप हा टोळी प्रमुख म्हणून सूत्र चालवत असून, तो सराईत गुन्हेगार आहे. जबरी चोरीचे त्याच्या विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपनिरीक्षक अविनाश राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पप्पू उर्फ मंगेश युवराज जगताप याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संघटीत पणे भटकी टोळी तयार करुन गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करुन, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष मिसळे तपास करत आहेत.
गुन्हेगारांवर जरब बसवणार
कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे प्रकटीकरणाच्या अनुषंगाने सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांना निर्देश देण्यात आले आहेत. केवळ कागदोपत्री गुन्ह्यांचा तपास न करता, स्थानिक गुंड आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. यादीवरील गुन्हेगारांची पडताळणी केली जात असून, संघटीत टोळ्या करुन कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍यांची गय केली जाणार नाही. कायदा काय असतो, हे त्यांना चांगल्या पध्दतीने दाखवून दिले जाणार आहे. कोरेगावातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जागरुक नागरिकांनी न घाबरता पुढे येऊन पोलिसांना माहिती दिल्यास, गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल.
– सुनील गोडसे, पोलीस निरीक्षक, कोरेगाव.