खताच्या दुकानातील चोरीप्रकरणी 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

रहिमतपूर पोलीसांनी मोठी कारवाई
रहिमतपूर : रहिमतपूर-तारगांव-मसूर रोडवर रिकिबदारवाडी (ता.कोरेगाव) येथे दि. 27 एप्रिल 2019 रोजी खताच्या दुकानात चोरी झालेल्या सेनकॉर कंपनीचे चार लाखाचे तणनाशक व तमर कंपनीचे 2 लाख 70 हजार रुपयांचे तणनाशकाचा मुद्देमाल व बोलेरो पिकअप, आल्टो कार, दोन दुचाकींसह 13 लाख 66 हजार किमतीचा मुद्देमाल रहिमतपूर पोलीसांनी हस्तगत करुन मोठी कारवाई केली.
याबाबत रहिमतपूर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार, दि. 27 एप्रिल रोजी रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमांनी दुकान फोडल्याचे व त्यातील तणनाशके व इतर किमंती शेती उपयोगी माल चोरीला गेल्याची माहिती रात्रगस्तीवर असणार्‍या रहिमतपूर पोलीसांना मिळाताच तात्काळ नियंत्रण कक्ष सातारा येथे फोनकरुन कराड, उंब्रज, बोरगांव (ता.जि.सातारा) येथे नाकांबदी करण्यात आली.
दरम्यान, प्राथमिक तपासात गोपनीय सूत्रांच्या कडून सदरचा माल हा मसूर रोडच्या दिशेने एका पाढंर्‍या रंगाच्या बोलेरो पिकअप (क्र. एम.एच.10 बी.आर. 5249) या वाहनातून त्यासोबत आल्टो कार व दोन दुचाकी वाहनांचा उपयोग करुन आरोपींनी चोरी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन झाले.
सदर गाडीच्या क्रमांकावरुन गाडीचा मालक व पत्ता प्राप्त करुन गाडी मालकांपर्यंत पोहचताच त्याच्याकडून मुख्य आरोपी रामचंद्र उर्फ बापू आनंदा वडार (पवार) वय 28 (रा. शिराळा, जि. सांगली) याने सदरची गाडी चोरी करण्याकरिता भाड्याने घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यास त्याच्या राहत्या घरात छापा टाकून ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर दुसर्‍या दिवशी मिळालेल्या अधिक गोपनीय माहितीवरुन मुख्य आरोपीच्या घरी जावून चोरीला गेलेल्या मुद्देमाला संदर्भात झडती घेतली असता सदरचा मुद्देमाल आरोपीच्या नातेवाईक, साथिदारांनी कराड तालुक्यातील नांदगाव येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यावेळेस तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. ढवळे, कराड तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. क्षीरसागर यांच्या मदतीने त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक श्री. भापकर यांच्या मदतीने नांदगाव (ता. कराड) येथे कृष्णा गणपत नलवडे याच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घराच्या बाजूच्या झोपडीमध्ये चोरीचा माल लपवून ठेवल्यो निष्पन्न झाले. त्यावेळी आरोपी रामचंद्र वडार याचा सासरा कृष्णा नलवडे व त्याचा मुलगा रोहीत नलवडे हे नातेवाईक चोरीत सक्रीय असल्याचे उघडकीस आल्याने त्यांना अटक करण्यात आली. कोरेगाव न्यायालयापुढे उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सदर चोरी उघडकीस आणण्यात पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गरुड, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक श्री. राठोड, श्री. भापकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड, विशाल जाधव, श्री. मांडवे, उब्रंज पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख व शिराळा पोलीस स्टेशनच्या स्टाफ या सर्वांनी यात महत्वाची कामगिरी बजावली.
या गुन्ह्याच्या तपासात आरोपींचे साथीदार यांचा पोलीस कसून तपास करीत आहेत. तरी रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांनी आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या कृषी सेवाकेंद्रावरील दुकानात चोरी झाली असल्यास त्यांनी पोलीसांशी संपर्क साधावा.