कासवर फुलांचे गालिच्छे येण्यास सुरुवात

परळी : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या कासच्या पुष्पपठारावर रंगीबेरंगी फुलांचे आगमन होण्यास सुरुवात झाली असून कास पठार कार्यकारी समितीच्यावतीने शनिवार एकतीस ऑगस्ट पासून हंगामाची अधिकृत सुरुवात होत आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या घोषणेनंतर पर्यटकांना पठारावर जाण्यासाठी शंभर रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागणार आहे.
येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांचे पार्किंगची सोय घाटाई फाटा येथे करण्यात आली असून वाहने तेथेच ठेवून पठारावर समितीच्या बसने जावे लागणार आहे. यासाठी दहा रुपये शुल्क आकारले जाणार आहे. पर्यटकांना गाईड हवा असल्यास शंभर रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच पठारावर नो पार्किंग झोन करण्यात आला असून पठारावर वाहन नेल्यास दंड आकारला जाणार आहे. तसेच फुलांची अथवा साधनांची नासधूस केल्यास उपद्रव शुल्क म्हणून पाचशे ते एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
पर्यटकांसाठी अचानक पाऊस आल्यास किंवा विश्रांतीसाठी कास पठारावरील टोलनाका तसेच राजमार्गावर शेड उभारण्यात आली आहेत. तसेच स्वच्छतागृहांची सोय ही तेथेच करण्यात आली आहे.
पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी तसेच नियंत्रणासाठी 137 स्वयंसेवकाची नेमणूक करण्यात आली आहे. पठारावर मोबाईल रेंज मिळत नसल्याने तसेच विस्तीर्ण पठारावर संपर्कासाठी कर्मचार्‍यांकडे वॉकीटॉकी द्वारे संपर्क केला जाणार आहे.
पठारावरील फुले पाहण्यासाठी सततच्या पावसाने वाटा शेवाळून निसरड्या होतात. त्यामुळे यावर्षी फुले पाहण्यासाठी पठारावर जांभ्या दगडातील वाटा ही करण्यात आल्या आहेत. तसेच पठारावर फुलांची माहिती देणारे, तसेच घ्यावयाची काळजी याबाबतचे सूचना फलक ही लावण्यात आले आहेत.
पठारावर एकाद्यावेळी पर्यटकांची प्रचंड गर्दी होवून सर्व व्यवस्थेवर ताण येतो. तसेच फुलांचे ही नुकसान होते हे टाळण्यासाठी नियंत्रीत पर्यटनाला चालना देण्यासाठी ऑनलाईन बुकींग ुुु.ज्ञरी.ळपव.ळप या साईटवर उपलब्ध केले असून याद्वारे दिवसाला तीन हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे.
तसेच यावर्षी कास पठार परिसर दर्शन बससेवा ही विशेष बस सुरू करण्यात येणार आहे. घाटाई फाटा, कास तलाव, वजराई धबधबा, अंधारी, सह्याद्रीनगर, एकीव हा या बसचा रूट असून येथील प्रसिद्ध ठिकाणे दाखवण्यात येगार आहेत. यासाठी प्रतिव्यक्ती चारशे रुपये शुल्क असणार आहे. तसेच यावर्षी पर्यावरण पूरक पर्यटनासाठी कासच्या टोलनाक्यावर सायकली ठेवण्यात येनार असून पठारावर फिरण्यासाठी एका तासासाठी शंभर रुपये शुल्क आकारुन ही सायकल देण्यात येनार आहे. पण त्यासाठी ओळखपत्र द्यावे लागणार आहे. कासवर सद्यस्थितीत पांढरे गेंद, किटकभक्षी निळी सितेची आसव, निळे जांभळे आमरीचे दोन तीन प्रकार, जांभळा तेरडा, पिवळी सोनकी, टुथब्रश, वायतुरा, रानहळद, निलीमा, अबोलिमा आदी फुलांच्या जाती दिसत असून पठार पूर्णपने अच्छादीत होण्यासाठी अजून थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.