खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा भाजपात प्रवेश

सातारा : सातारचे राष्ट्रवादीचे खा. छ. उदयनराजे भोसले यांनी अखेर राजेशाही पध्दतीने भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करत पश्चिम महाराष्ट्रात पक्ष बांधणी या मजबूत करण्याचे आश्वासन दिले. रात्री दीड वाजता खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढं चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचे काम करताहेत. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन मी भाजपशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीत माझा कोंडमारा होत असल्याची कबुली उदयनराजे यांनी यावेळी दिली.
गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपात दाखल होतील अशी चर्चा होती. मात्र उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर उदयनराजे यांनी भाजपात प्रवेश करत असल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. उदयनराजेंना राष्ट्रवादीच्यावतीने थोपवण्याचा प्रयत्न खा. अमोल कोल्हे, आ. धनंजय मुंढे, आ. शशिकांत शिंदे यांनी केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही त्यांनी भेट घेतली मात्र उदयनराजे यांना ते थोपवू शकले नाहीत.
उदयनराजेंचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्यानंतर शुक्रवारी रात्री पुण्यातून विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. गिरीष महाजन यांच्यासमवेत उदयनराजेंची स्वारी दिल्लीकडे रवाना झाली. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपला खासदारकीचा राजीनामा सादर केला. हा राजीनामा तात्काळ स्विकारण्यात आला.
शनिवारी सकाळी नवी दिल्लीत उदयनराजेंच्या प्रवेशाचा खास सोहळा अमित शहा यांच्या निवासस्थानी पार पडला. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले, नामदार गिरीष महाजन, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे आदी यावेळी उपस्थित होते. उदयनराजे यांनी यावेळी मोदी व शहांची तोंडभरून स्तुती केली. देश एकत्र, एकसंध व मजबूत कसा राहील, यासाठी मोदी व शहा हे काम करत आहेत. त्यांच्या कामामुळं देशातील प्रत्येक राज्यात भाजपची वाढ होतेय. लोक या पक्षात येऊ इच्छित आहेत, असे उदयनराजे म्हणाले. काश्मीरमधील 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले. यापुढं मी मोदी, शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपमधील माझ्या सहकार्‍यांच्या साथीने समाजासाठी काम करेन, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
छत्रपती शिवरायांचे वंशज भाजपमध्ये येताहेत याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस, ना. चंद्रकांतदादा पाटील यांनीही मनोगत व्यक्त करुन उदयनराजेंच्या भाजपात येण्याने भाजपाला अधिक बळकटी येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
उदयनराजे यांचा शाही प्रवेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रवेश व्हावा, अशी अपेक्षा खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली होती. मात्र उदयनराजेंच्या प्रवेशाच्यावेळी मोेदी अनुपस्थित होते. मोदींच्या उपस्थितीत आपला प्रवेश होणार आहे, असे खुद्द उदयनराजेंनीच ट्विट केले होते मात्र, तसे झाले नाही. भाजपच्या केंद्रीय नेत्यांपैकी केवळ अमित शहा आणि भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा हेच यावेळी उपस्थित होते.
सातार्‍यात फटाके फुटले, पेढयांचेही वाटप
सातार्‍याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सातार्‍यातील पोवईनाक्यावर एकत्र येवून जोरदार घोषणाबाजी केली. एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी पेढेवाटप करुन आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी सुनिल काटकर, सुहास राजेशिर्के, विजय काटवटे, अ‍ॅड. विलास आंबेकर, श्रीकांत आंबेकर, नितीन शिंदे,
शेवटच्या श्वासापर्यंत रयतेसाठी काम करेन : उदयनराजे
राजे शिवछत्रपतींचा आदर्श व आशीर्वाद घेऊन आजपर्यंत रयतेसाठी काम करत राहिलो. हीच परंपरा यापुढे ही मोठ्या हिंमतीने चालवण्याची शक्ती आम्हास रयतेकडून मिळते, हीच प्रेमाची साथ व आशीर्वाद सदैव पाठीशी राहो हीच मनोमन इच्छा. तुमच्यासाठी कालही होतो, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत असेन. असेही उदयनराजेंनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.