नाबार्डच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची सातारा जिल्हा बँकेस अभ्यासासाठी भेट 

सातारा : ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणनेसाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड हि एकमेव शिखर संस्था आहे. शेतीक्षेत्र, लघुद्योग, ग्रामीण कुटिरोद्योग, हस्तोद्योग या क्षेत्रांना गुंतवणूक व उत्पादन कार्यासाठी वित्त पुरवठा करणे तसेच राज्य सहकारी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका व भूविकास बँका इत्यादीना अल्प/मध्यम/ व दीर्घ मुदत कर्जे देणे आणि महत्वाचे म्हणजे सहकारी बँका, राज्य सहकारी बँकाच्या कार्याची तपासणी करणेचे अधिकार नाबार्डला आहेत.
अशा या शिखर संस्थेत नव्याने निवड झालेल्या चार प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाची पद्धत समजून घेणेसाठी सातारा विभागाचे नाबार्डचे अधिकारी मा. श्री. सुभोध अभ्यंकर यांचे समवेत भेट दिली.
कृषी, बँकिंग, सहकार क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी यांनी सातारा जिल्हा बँकेचे कामकाजाची कार्य पद्धती समजून घेणेसाठी यापूर्वीही भेटी दिल्या आहेत. नाबार्ड मार्फत अर्थसहाय्य केलेल्या जिल्ह्यातील प्रकल्प, शेतकरी मंडळ, महिला बचत गट तसेच इतर यशस्वी केंद्राची पाहणी करून जिल्हा बँकेच्या कामाचे कौतुक केले जाते. प्रामुख्याने जिल्हा बँकेची 0% छझ ची परंपरा, शेतकरी मंडळासाठीचे उल्लेखनीय कार्य, विकास संस्था सक्षमीकरण, विकास संस्थाना बिझनेस डेव्हलपमेंट प्लान अंतर्गत इतर व्यवसायास अर्थसहाय्य व मार्गदर्शन, पडीक जमीन विकास कार्यक्रम, महिला बचत गटाची मोठी चळवळ, संगणकीय कार्यप्रणाली अशा विविध सातत्यपूर्ण ग्रामीण विकासाची राज्य व देशपातळीवर नोंद घेऊन नाबार्ड, राज्य बँक, तसेच इतर सहकारी संस्था मार्फत सातारा जिल्हा बँकेस अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
नाबार्ड कडून भेटीस आलेल्या प्रशिक्षनार्थिनी बँकेची सखोल माहिती घेऊन आपल्या शंका निरसन करून घेऊन बँकेच्या कार्याचा आदरपूर्वक गौरव केला.
बँकेच्या कोरेगाव येथील विभागीय कार्यालयास  भेट देऊन महिला बचत गटातील प्रमुख महिला पदाधिकारी यांचा नेतृत्व विकास कार्यक्रम, शेती क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांचेशी चर्चा करून नाबार्ड व बँकेचे कामकाजातील योगदान समजून घेतले.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी बँकेच्या गेल्या सहा दशकाची यशस्वी वाटचाल विषद केली. यामध्ये विशेष करून बँकेची वसुली यंत्रणा , ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ठ निधी नियोजन, शून्य टक्के निव्वळ एन.पी.ए., दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमुक सेवा यामुळे बँकेस आय.एस.ओ. 9001-2008 मिळालेले नामांकन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झालेली नोंद, सामाजिक बांधिलकी तसेच राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे खूप कमी वेळात आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक सेवा सुविधा देणेसाठी कोअर बँकिंगचा  अवलंब केलेला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना सायबर क्राईम सारख्या  येणार्‍या अडचणींमुळे बँकेने सुरक्षिततेबाबत दक्षता घेतली आहे.
प्रारंभी नाबार्ड जिल्हा प्रमुख श्री अभ्यंकर यांनी नाबार्ड या देशापातळीवरील संस्थेने प्रशिक्षानार्थींची भेटीसाठी जिल्हा बँकेची निवड का केली याची माहिती दिली. प्रशिक्षानार्थींनी आपापला परिचय करून देऊन बँकेच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नाबार्ड, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध नाविन्यपूर्ण योजना व बँकेची उत्कृष्ठ कार्यप्रणाली असल्याने अशा प्रकारच्या कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेची नेहमीच निवड करीत असते.  या प्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक प्रशासन व वित्त , एस. एन. जाधव, सरव्यवस्थापक कर्जे व विकास श्री. एम. व्ही. जाधव, व्यवस्थापक श्री. सुजित शेख, राजेंद्र गाढवे, विभागातील उपव्यवस्थापक, अन्य अधिकारी व सेवक उपस्थित होते.