वणवे रोखण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची मागणी

औंंध : जायगाव रस्त्यावर असणार्‍या खिंडीतील डोंगरास आग लागल्याने मोठे नुकसान झाले. उन्हाळ्यात सुरू होणारे वणवे रोखण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, औंध ते जायगाव रस्त्यावरील खिंडीनजीक असणार्‍या वनविभागाच्या क्षेत्रातील डोंगर रविवारी पेटला होता. हा डोंगर नेमका कशामुळे पेटला हे समजू शकले नाही. पण यामार्गावरून जात असलेल्या जायगाव येथील नवनाथ देशमुख यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी स्वतः सुमारे एक तास झाडांच्या पानांंच्या झावळयांंनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व सुमारे दहा एकरातील आग विझविली. सुदैवाने वारे नसल्याने व नवनाथ देशमुख यांच्या जागृकतेमुळे डोंगरावरील आग आटोक्यात आली.
यामुळे या परिसरातील अनेक छोटीमोठी झाडे जळाली,जीवजंतू नष्ट झाले आहेत. याबाबत वनविभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अनेक जण नाँट रिचेबल होते तर काही जणांनी फोनच उचलले नाहीत.
यामुळे या विभागातील वनपाल, वनअधिकारी कर्मचार्‍यांच्या कार्य पध्दतीबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे वन विभाग असाच क्रियाशील राहणार का असा संतप्त सवाल ही उपस्थित केला जात आहे. याठिकाणी कायर्क्षम, कार्यतत्पर कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी.