शेणोलीतील शैक्षणीक उपक्रमांचे अनुकरण होईलः आ.चव्हाण

कराडः समाजामध्ये आजदेखील रुढी, परंपरा व अंधश्रध्देचे साम्राज्य आहे. यातून बाहेर पडलो तरच पुढील पिढीचे भवितव्य आपण सुरक्षित ठेवू. वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासल्यास समाजावरील या साम्राज्याला बगल देता येईल. त्या अनुषंगाने शेणोलीमध्ये जे शैक्षणीक उपक्रम उभे राहिले आहेत. त्या उपक्रमांचा हा परिसर अनुकरण करेल, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. शेणोली (ता. कराड) येथील जिल्हा परिषद शाळेसाठी पुणे येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम न्यासकडून मिळालेल्या देणगीच्या धनादेश वितरण समारंभ सोहळ्यात ते बोलत होते. भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार विश्वजीत कदम अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते, मोटार वहान निरीक्षक चैतन्य कणसे, सरपंच आदित्या कणसे, पलूसचे उपनगराध्यक्ष विक्रम पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव नितीन पाटील, कडेगाव-पलूसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, माजी पंचायत समिती सदस्य बाबूराव पाटील, बाजार समितीचे माजी संचालक प्रतापराव देशमुख, अभय पाटील, आबा सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शेणोलीच्या जिल्हा परिषद शाळेची इमारत इतकी सुंदर बनली आहे की, तिचे सौंदर्य कुणाला पटणार नाही. शेणोलीप्रमाणे अशा प्रकारच्या इमारती उभारण्यासाठी शासनाला तितका निधी वळवता येणार नाही. 1960 साली कोठारे आयोगाने देशाच्या एकूण उत्पन्नातील सहा टक्के हिस्सा शैक्षणीक विकासासाठी गुंतवण्यासाठी शिफारस केली आहे.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देशातील शिक्षण व्यवस्थेवर एकूण उत्पन्नातील 3.8 टक्के हिस्सा देण्यामध्ये यश मिळाले होते. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा स्पर्धात्मक शिक्षण व संशोधनासाठी आग्रह होता. सध्याच्या सरकारच्या काळात शिक्षणावर विशेषतः आणखी दुर्लक्ष झाल्यामुळे उत्पन्नातील 2.2 टक्के हिस्सा शिक्षणासाठी खर्च केला जात आहे. त्यामुळे सर्व शिक्षा अभियानसारखी काँग्रेसची महत्वपूर्ण योजना भाजप सरकारने पूर्णतः गुंडाळली. त्यामुळे शैक्षणीक विकासासाठी पायाभूत सुविधा उभारताना मर्यादा आल्या आहेत. ते म्हणाले, शैक्षणीक विकासासाठी लोकसहभागाची संस्कृती फारशी रुजत नाही. परंतु लोकसहभागातून शिक्षण पुढे नेणारे शेणोलीतील उपक्रम खरंच दुर्मिळ उदाहरण आहे. स्पर्धेच्या युगात चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतले तरच टिकाव लागेल. याचे पतंगराव कदम हे प्रेरणादायी उदाहरण आहे. कदमसाहेबांनी अतिशय कठीण परिस्थितीत शैक्षणीक विश्व निर्माण केले. त्यांच्यासारखी दृष्टी असणारी माणसं समाजात असल्यानंतर गतीमान शिक्षणाला आणखी गती प्राप्त होईल.
काँग्रेसचे सरकार आल्यानंतर एकूण उत्पन्नातील शिक्षणाचा हिस्सा नक्कीच वाढवू. आ. विश्वजीत कदम म्हणाले, आमचे कदम कूटूंबिय शेणोलीस डावलूही शकत नाही. आणि विसरुही शकत नाही. पतंगराव कदम यांनी आपल्यावरील उपकराची कायम जाणीव ठेवावी ही शिकवण दिली आहे. ती समाजात वावरल्यानंतर खूप उपयोगी ठरल्याचे दिसते. डॉ. मोहिते म्हणाले, बुध्दीजीवी काम हे सर्वांच्या एकीतून गावाला दिले जाते. त्यासाठी मोकळे वातावरणही महत्वाचे आहे.
या दोन्हींचा मेळ शेणोलीतील शैक्षणीक समृध्दीच्या उपक्रमात बसलेला दिसतो. सुनिल शामराव कणसे यांचे भाषण झाले. प्रारंभी धनादेश वितरण व धर्नुविद्या प्रशिक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. राहूल पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रविण पाटील, विजय पाटील, लालासाहेब पाटील, अजय चव्हाण यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱयांनी स्वागत केले. सुभाष कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.