नेरळेपुला नजिक कोयना नदित गवारेडा मृत अवस्थेत ; बघ्यांची गर्दी.

पाटण:- नेरळेगौंड पुला नजिक शनिवार दि. १८ आज सकाळी कोयना नदीपात्रात चारशे ते साडेचारशे किलो वजनाचा गवारेडा मृत अवस्थेत आढळून आला. पाणी पिण्यासाठी कोयना नदीत उतरलेला गवारेडा पाण्याचा अंदाज न आल्याने नदी पात्रात ओढला गेला असावा अथवा व त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने गवारेड्याचा मृत्यू झाला असावा अथवा शेतीच्या सुरक्षिततेसाठी कुंपनाला दिलेल्या इलेक्ट्रीक शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्यावर त्याला नदीपात्रात फेकले असावे असा अंदाज पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी लावला असुन. या गव्याला नदीपात्रातून बाहेर काढून त्याच्यावर वनविभागाने अंत्यसंस्कार केले आहेत. दरम्यान, गवारेड्याला पाहण्यासाठी नागरिकांनी नेरळेगौंड येथे मोठी गर्दी केली होती.

पाटणपासून दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नेरळेगौंड परिसरात ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना शनिवारी सकाळच्या सुमारास कोयना नदीच्या पाण्यामध्ये गवारेडा मृत अवस्थेत दिसून आला. ग्रामस्थांनी तात्काळ याबाबतची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत गवारेड्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचे दहन करण्यात आले. सदर गवारेडा हा कोयना विभागात असणाऱ्या जंगलामधून अन्न आणि पाण्याच्या शोधार्थ आला असावा. कोयना नदीपात्रात पाणी पिण्यासाठी आल्यावर तो खोल पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान कोयना नदीपात्रात गवारेडा मृतावस्थेत असल्याची बातमी समजताच गवारेड्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

याबाबत पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांच्याशी संपर्क साधला असता सदर गवारेडा हा अंदाजे ७ वर्षे वयाचा असून त्याचे वजन ४०० ते ४५० किलो असावे. गवारेड्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अथवा शेतीच्या सुरक्षिततेसाठी कुंपनाला दिलेल्या इलेक्ट्रीक शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्यावर त्याला नदीपात्रात टाकले असावे असा संशय आहे. याबाबत शवविच्छेदनाचा अहवाल मिळाल्यावर खरे ते कारण स्पष्ट होईल, अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.