भाजपने उदयनराजेंना दिलेला शब्द पाळावा : राज्यसभेवर नियुक्तीकरून मंत्रीपद द्यावे

सातारा (शरद काटकर) : संपूर्ण देशात सन्मानाचे स्थान असलेल्या छत्रपती शिवरायांचे थेट 13 वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पराभवाच्या धक्कयातून साताराच्या गादीवर प्रेम आणि निष्ठा ठेवणारे अद्यापही सावरले नाहीत. हा पराभव उदयनराजेंचा नाही तर तमाम जनतेचा पराभव आहे. ही जनमानसातील भावना दिवसेंदिवस बळावत चालली आहे. निवडूण आले तर पक्षाचे यश अन्यथा पराभवाचे मानकरी उदयनराजे ही भावना न ठेवता भाजपाच्या पक्ष नेतृत्वाने पराभव झाला तरी राज्यसभेवर घेवून मंत्रीपद देण्याचा शब्द पाळून लवकरात लवकर गादीचा सन्मान करावा या मागणीचा जनरेटा वाढू लागला आहे.
2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे सुमारे सव्वा तीन लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले होते. हा विक्रम देशात फक्त उदयनराजेंनीच केला. त्यावेळी उदयनराजेंना राष्ट्रवादीबरोबरच शंभूराजे देसाई, पृथ्वीराज चव्हाण, मनोज घोरपडे, मदन भोसले, यांनी पक्षाच्या चौकटीत न राहता पक्ष म्हणून नव्हे तर मित्रत्व आणि राजगादीचा विचार केल्यानेच उदयनराजेंना मदत केली. त्यानंतर 2019 साली सेना भाजपने नरेद्र पाटील यांना सेना-भाजपची उमेदवारी देवून कडवेे आव्हान उभे केले. मोदी लाटेत ही उदयनराजेंनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अबाधित राखत सुमारे सव्वा लाखाच्या मताधिक्याने उदयनराजे विजयी झाले.
देशात मोदी लाटेने केंद्रातील निर्विवाद सत्ता काबीज केली. उदयनराजे विजयी झाले पण मतदारांना निवडणुकीच्यावेळी दिलेला शब्द आणि विकासकामे अडचणीत येणार हे लक्षात येवून कार्यकर्त्यांनीच त्यांच्यावर जनहित लक्षात घेवून राजीनाम्यासाठी दबाव आणला. राज्याचे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस आणि उदयनराजें यांची असलेली घट्ट मैत्री सर्वृश्रुत आहे. कार्यकर्त्यांच्या सुरात सुर मिसळून भाजपाच्या नेतृत्वानेही उदयनराजेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा देवून भाजपात प्रवेश करावा अशी अटकळ बांधली. अवघ्या तीनच महिन्यातील राजीनामा उदयनराजेंसाठीही पचनी पडत नव्हता यासाठी भाजपच्या नेत्यांनी अनेकदा त्यांच्यासोबत बैठका घेवून राजीनामा देण्यास अखेर भाग पाडले.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. सातारा लोकसभा मतदार संघात सातारा आणि पाटण वगळता अन्यत्र कराड उत्तर, कराड दक्षिण, कोरेगाव, वाई, या मतदार संघात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ही बाब राजीनाम्यापूर्वीच्या बैठकीत चर्चेत आली होती. अशा परिस्थितीत ही आपण राजीनामा द्यावा असे उदयनराजेंना वाटत नव्हते राजकारणातूनच अलिप्त व्हावे अशी माध्यमांसमोर त्यांनी प्रतिक्रया देखील दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी निवडणुकीचा निकाल काही लागला तरी सातारच्या राजगादीचा उचित सन्मान राखला जाईल असा शब्द दिला होता. या शब्दाखातर उदयनराजेंनी जनहीत लक्षात घेवून अवघ्या तीनच महिन्यात राष्ट्रवादीचा राजीनामा देवून भाजपच्या नेत्यांचा मान राखला.
उदयनराजेंनी अवघ्या तीन महिन्यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा दिलेला राजीनामा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्याबरोबरच यामतदार संघातील जनतेला पटला नाही. राजकारणात मुरब्बी असलेले शरद पवार यांनी जेवढी ताकत उदयनराजेंच्या विरोधात उभी करता येईल तेवढी ताकद उभी केली. उदयनराजेंच्या विरोधात तगडा उमेदवारच मिळत नसल्याने राष्ट्रवादीपुढे पेच निर्माण झाला. माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारीसाठी आग्रह करण्यात आला. चव्हाण यांना उमेदवारी देवुन कॉग्रेंसची निर्णायक मते राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फायदेशीर ठरतील. चव्हाण निवडून आले तर राष्ट्रवादीचा त्यांचा डोक्यावर हात राहील आणि पराभूत झाले तर सातारच्या राजगादीचा सन्मान राखण्यासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही. अशी दुहेरी खेळी करून जनमाणसात राष्ट्रवादीची प्रतिमा उजळ करून त्याचा फायदा राज्यभर उठवण्याचा शरद पवारांचा डाव पृथ्वीराज चव्हाण यांनी ओळखुन नकारात्मक भूमीका घेतली.
उदयनराजेंना उमेदवार देताना कराड-पाटण या दोनच मतदार संघातील देण्याचा पवारांचा मनसुबा होता. या दोन तालुक्यातील उमेदवार दिल्यास पाटण, कराड दक्षिण, कराड उत्तर, या तीन विधानसभा मतदार संघातील मताधिक्य उदयनराजेंना अडचणीचे ठरेल ही त्यांची खेळी होती. श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली तरी त्यांचे वास्तव्य कराड आणि जन्मगाव पाटण असल्याने त्यांना सहानुभूती मिळेल श्रीनिवास पाटील जिल्हाधिकारी असताना त्यांच्यावरच कोणताही प्रशासनाचा ठपका नाही, प्रशासनाचा अनुभव असल्याने खासदार पदाच्या काळात एक रूपयाचा ही विकास कामांचा निधी परत गेला नाही. सिक्कीमचे राज्यपाल असताना या मतदारा संघातील 10 ते 15 हजार कुंटुंबाची सिक्कीमध्ये दिलेल्या सोई सुविधा, जनमाणसांत असलेला जनसंपर्क या सर्व बाबी लक्षात घेवून उदयनराजेंच्या विरोधात वयाच्या 80 व्या वर्षी उदयनराजेंच्या विरोधात उमेदवारी देवुन शरद पवारांनी वेगळीच चाल खेळली. या लोकसभेच्या निवडणुकीत उदयनराजेंचा 87 हजार 717 मताधिक्याने श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला.
संपूर्ण देशात फोकस झालेल्या या निवडणुकीत उदयनराजेंचा झालेला पराभव राजगादीवर प्रेम करणार्‍या निष्ठावंताना आणि तमाम मराठा बांधवाना जिव्हारी लागला आहे. आजही कार्यकर्ते त्यातुन सावरलेले नाहीत. उदयनराजेंनी रिस्क घेवून राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेतृत्वाने राज्य सभेवर घेवून केंद्रीय ंमंत्रीपद देवून राजघराण्याचा उचित सन्मान करण्याचा दिलेला शब्द आता लवकरात लवकर पाळावा असा जनरेटा आता दिवसें-दिवस वाढू लागला आहे. विधानसभा निवडणूकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. उदयनराजेंचा सन्मान करून त्यांच्या वलयाचा आणि राजगादीचा सन्मान करावा., उदयनराजें हे तरूणाईतील अयडॉल आहेत या त्यांच्या प्रतिमेचा फायदा करून घ्यावा. उदयनराजेंना दिलेल्या शब्द पाळण्यासाठी भाजपने विलंब लावल्यास साताराच्या राजगादीशी गद्दारी केली अशा स्वरूपाचा गैरसमज तमाम मराठा समाजात पसरला जाईल. विरोधकाना जशास तसे उत्तर देण्यासाठी उदयनराजेंना लवकरात लवकर राज्यसभेवर घ्यावे मागणींने जोर धरला आहे.